वन विभागाने मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी
खेड : तालुक्यातील नारंगी नदीपात्रात मगरीने केलेल्या हल्ल्यात चिंचघर – प्रभूवाडी येथे राहणारा जीवन हरिश्चंद्र कडू 25 वर्षीय या युवकासह त्याचा बैल ही जखमी झाला. ही घटना 8 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. मगरीच्या हल्ल्ल्यात जखमी झालेल्या जीवन कडू याला उपचारार्थ दापोली येथील शासकीय रुग्णालयात एका खासगी वाहनाने दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून जीवन कडू हे आपल्या बैलाला पाणी पाजण्यासाठी नारंगी नदी पात्रात उतरवले होते. बैलाला पाणी पाजून त्याला धुवत असताना मगरींनी त्याच्यावर आणि बैलावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात जीवन कडूच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. बैलावर देखील हल्ला चढवत जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीपात्रातील मगरींचा बंदोबस्त वन विभागाने करावा अशी मागणी चिंचघर ग्रामस्थांनी केली आहे.