https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

गुहागरमधील पिंपर धरणाच्या दुरुस्तीला सुरुवात

0 58

नेत्रा ठाकूर यांनी केला शुभारंभ : 20 दिवसात काम पूर्ण होणार

गुहागर : तालुक्यातील पिंपर धरणाची खराब झालेली रबर सील आणि झडपांच्या देखभालीच्या कामाला गुरुवार (दि. 26) पासून सुरवात झाली आहे. या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांनी केला. लघु पाटबंधारे विभागामार्फत अभियंता सुभाष बागेवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे.
गुहागर तालुक्यात मोडकाआगर आणि पिंपर ही दोन मोठी धरणे आहेत. लघुसिंचनासाठी तयार करण्यात आलेल्या या दोन धरणांचा सध्याचा वापर हा बहुतांशी पाणी पुरवठा योजनांसाठी होतो. पिंपरच्या धरणावर बसवलेल्या झडपा नादुरुस्त झाल्याने गेल्यावर्षी पासून धरणाला गळती लागली होती. यावर्षी गळती वाढली. या गळतीमुळे पालशेतमधील छोट्या नाल्याला सध्या भरपुर पाणी आहे. सदर गळती रोखली नाही तर पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होईल अशी भिती होती. पिंपरमधील ग्रामस्थ, जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांनी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे धरणाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा आमदार जाधव यांनी केला.
गुरुवारी (26 मे) गळती रोखण्याचे काम करणारी पाटबंधारे विभागाची टीम पिंपर येथे दाखल झाली. सौ. नेत्रा ठाकूर यांनी श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला. या कामाची माहिती देताना अभियंता सुभाष बागेवाडी म्हणाले की, पिंपर धरणाला गळती लागल्याचे सांगितले जात आहे. परंतू ही गळती नसून पिंपर धरणाला असलेल्या झडपांची रबर सील नादुरुस्त झाल्याने पाणी वाहून जात आहे. या धरणाला कोणताही धोका नाही. काम झाल्यावर ही गळती बंद होईल. त्यामुळे घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे झडपा उघडण्यासाठी असणाऱ्या यंत्रणेची देखभाल करावी लागणार आहे. सध्या पाण्याची पातळी कमी असल्याचे धरणांच्या झडपांचे काम हाती घेतले आहे. त्यानंतर झडपा उघडणाऱ्या यंत्रणेची देखभाल केली जाणार आहे. 15 ते 20 दिवसांत हे काम पूर्ण होईल. सर्वच धरणांच्या झडपांचे असे काम नियमित कालावधीत करावे लागते.
यावेळी पिंपरच्या सरपंच उर्वि मोरे, उदय मोरे, गोविंद काजारे, शाखाप्रमुख निखिल मोरे, मंगेश मोरे, विजय मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी कामाला सुरवात झाल्याने ग्रामस्थांनी आमदार भास्कर जाधव आणि जि.प. सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

पिंपर धरण दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ करताना सौ. नेत्रा ठाकूर

Leave A Reply

Your email address will not be published.