गृहराज्य मंत्री सतेज पाटील 16 जूनला चिपळूण दौर्यावर
जिल्हा काँग्रेस कार्यकर्ता शिबिराचे आयोजन
चिपळूण : राज्याचे गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील हे 16 जून रोजी चिपळूण दौर्यावर येत असून जिल्हा काँग्रेसमार्फत आयोजित करण्यात आलेल्या चिपळुणातील शिबिराला ते उपस्थित राहणार आहेत.
येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळुणातील काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकार्यांना पक्षांच्या नेत्यांकडून पाठबळ व मार्गदर्शन मिळावे यासाठी चिपळुणात मंगळवार दि. 16 रोजी सकाळी 10 पासून सायंकाळी 4 पर्यंत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून राज्याचे गृहराज्यमंत्री व जिल्हा संपर्कमंत्री ना. सतेज पाटील उपस्थित राहाणार आहेत. त्याचबरोबर माजी खा. हुसेन दलवाई, माजी आ. व सरचिटणीस हुस्नबानु खलिफे, पक्ष निरीक्षक गुलाबराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड आदी प्रमुख पदाधिकारी जिल्हा शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळपर्यंत आयोजित या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याबाबत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासह मते जाणून घेतली जाणार आहेत. ना. पाटील यांच्या चिपळूण दौर्याची जबाबदारी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव व शहर अध्यक्ष लियाकत शाह यांच्यावर देण्यात आली असून दौर्याच्या नियोजनाकरिता प्रमुख नेत्यांची आज चिपळूण येथे नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाभरातून सुमारे दोन ते अडीच हजार कार्यकर्ते व पदाधिकारी या शिबिरात सहभागी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.