https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

चाणजे शेतकरी संघर्ष समिती करणार 18 मे पासून आमरण उपोषण

0 62

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धारण तलाव क्र.2 वर शेतजमीनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक सुरु आहे. येथे जड वाहनांना बंदी असूनही जड वाहनांची वाहतूक नेहमी सुरु असल्याने हे जड वाहतूक थांबवून हाईट गेज पूर्ववत करून साकवचे अस्तित्व अबाधित ठेवावेत अन्यथा चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला होता.

या महत्वाच्या समस्यावर दिनांक 26/4/2022 रोजी तहसील कार्यालय उरण येथे महत्वाची मिटिंग संपन्न झाली. या मिटिंग मध्ये करंजा टर्मिनल कंपनीचे अधिकारी , तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, सिडको प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. या बैठकीत शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सिडको प्रशासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी केला आहे.सदर ठिकाणी संबंधित साकव/खारबंड रस्ता याचा थेट संबंध येथील शेतकऱ्यांच्या जमिनीशी  असून देखील करंजा टर्मिनल कंपनीचा काहीही संबंध नसताना येथील बाधित शेतकऱ्यांना न विचारता,न जुमानता बेकायदेशीर जड वाहतूक सुरु आहे.सदर ठिकाणी जड वाहतूक संबंधि शेतकरी यांची कोणतेही परवानगी न घेता त्या जागेवर विविध कामे सुरु आहेत.जड वाहनांची ये जा सुरु आहे.अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही समस्या सुटत नसल्याने,या महत्वाच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे अविनाश म्हात्रे यांनी बैठकीत सांगितले. कोणत्याही मागण्या पूर्ण होत नसल्याने बाधित शेतकऱ्यांनी चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 मे 2022 पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर माहिती अशी की शेत जमीन सुरक्षितेसाठी सिडकोने मौजे-चाणजे, ता. उरण येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन न करता शेतकऱ्यांच्या सर्व्हे न.418,422,423 या जमिनीवर साकव (pipe outlet) बांधले.साकवच्या सुरक्षितेसाठी साकव वरून जडवाहतूक न होण्यासाठी हाईट गेज लावण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड(पत्र दी.20/5/2016 व 28/2/2017) सिडको कार्यालय(पत्र दी.26/12/2016)यांच्याकडून करंजा टर्मिनल कंपनीस फक्त 2016 चा पावसाळा होईपर्यंत हाईट गेज काढून 25 टन पर्यंत वजनाच्या वाहतुकीस पत्राद्वारे परवानगी देण्यात आली होती.परंतु तेव्हापासून ते आत्तापर्यंत हाईट गेज लावण्यात आलेले नाही.परिणामी करंजा टर्मिनल कडून जडवाहतूक बेकायदेशीररित्या होत आहे. त्यामुळे संबंधित साकवचे  अस्तित्व धोक्यात आलेले आहे. चाणजे शेतकरी संघर्ष समिती कडून संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार करून देखील या गंभीर विषयाची दखल घेण्यात आलेली नाही परिणामी संघटनेकडून हायकोर्ट मध्ये जनहित याचिका(99863 of 2020) टाकण्यात आली आहे.तसेच करंजा टर्मिनल कंपनी कडून संबंधित साकव वरून बेकायदेशीररित्या 25 ते 30 टनाचा कार्गो सहित टिपर/हायवा ट्रकची खूप मोठी जडवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे साकवचे अस्तित्व व शेतजमिनीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.250 एकर शेत जमिनीचे भवितव्य धोक्यात आले आहे.त्यामुळे ताबडतोब बेकायदेशीररीत्या  चाललेली जडवाहतूक थांबवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून हाईट गेज पूर्ववत करण्यात यावे. अन्यथा  बाधित शेतकऱ्यांद्वारे आमरण उपोषण करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा बाधित शेतकऱ्यांच्या वतीने चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिला आहे.

प्रधान सचिव-महसूल विभाग मंत्रालय,महाराष्ट्र राज्य,विभागीय कोकण आयुक्त-नवी मुंबई,पालकमंत्री रायगड जिल्हा,जिल्हाधिकारी-रायगड,मुख्य कार्यकारी अधिकारी-महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, सहाय्यक पोलीस आयुक्त, न्हावा शेवा,तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा,नवी मुंबई,व्यवस्थापकीय संचालक सिडको नवी मुंबई,तहसीलदार उरण,वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण आदी ठिकाणी याबाबत पत्रव्यवहार करण्यात आले आहे.17 मे पर्यंत प्रश्न सुटला नाही तर चाणजे शेतकरी संघर्ष समिती तर्फे दिनांक 18 मे 2022 पासून प्रशासन विरोधात आमरण उपोषण करण्यात येईल अशी माहिती चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.