Ultimate magazine theme for WordPress.

चिपळूणचा परशुराम घाट आता दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत वाहतुकीस बंद

0 56

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहनधारकांचा गोंधळ

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. आता परशुराम घाट बंदच्या वेळेत बदल करण्यात आला असून 4 मे पासून दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत परशुराम घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असूत ती आंबडस, चिरणी मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, अचानक बदलेल्या वाहतुकीतील वेेळेमुळे या महामार्गावरुन व त्यासंदर्भातील आदेशानंतर वाहनचालकांंचा गोंधळ उडाला
परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असतानाच दरड कोसळणे, रस्ता खचणे अशा घटना घडू लागल्याने या कामात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच घाटात काम सुरू असताना दगड कोसळून काही घरांचे नुकसानही झाले होते. या घटनेमुळे रस्त्याच्या खालील बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे अवघ्या महिनाभरात सुमारे दीडशे मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात आली. अजूनही काही भागातील संरक्षक भिंतीचे काम शिल्लक आहे. मात्र, आता संबंधित कल्याण टोलवेज व ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्याच्या वरील बाजूस असलेल्या दरडीच्या बाजूने खोदाई सुरू केली आहे. सुमारे 23 मीटर उंच दरडीचा भाग असल्याने घाटातील हा अतिशय अवघड टप्पा मानला जात आहे. सुमारे 500 मी. लांब खोदाई करण्यात येणार आहे. हे काम जोरदारपणे सुरू आहे.
आता पावसाळ्यापूर्वी डोंगर कटाई करून तातडीने तेथेही संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी 25 हून अधिक पोकलेन, डंपर, डोजर अशी यंत्रणा कामाला लावली आहे. साधारण 25 मे पासून संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून तयारी केली जात आहे. त्यानंतर संपूर्ण जून महिना हे काम सुरू राहाणार आहे. अशातच लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगार व अन्य नागरिकांच्या सूचनेनुसार घाट बंदच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांमार्फत घेण्यात आला असून तसे पत्र प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.