https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

चिपळूणचे पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांना ‘अस्तित्व पुरस्कार’

0 92

मुंबईतील प्रसिद्ध ‘कोकण जत्रा’ कार्यक्रमात पुरस्कार प्रदान

चिपळूण : मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क समोरील बी.एम.सी. मैदानात ‘अस्तित्व ट्रस्ट’ने आयोजित केलेल्या ‘कोकण जत्रा’ महोत्सवाच्या समारोपप्रसंगी (दि. ८) पर्यटनासह कोकणच्या समस्यांवर सातत्याने गेली २५ वर्षे लेखन करणारे येथील पत्रकार-लेखक आणि पर्यावरण-पर्यटन विषयातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांना ‘अस्तित्व पुरस्कार २०२२’ देऊन सन्मान करण्यात आला. वाटेकर यांच्यासह कोकणच्या समृद्धीसाठी कार्यरत असलेले प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये, ‘द एलिफंट व्हिस्परर’ म्हणून ओळखले जाणारे nआणिहत्तींशी संवाद साधणारे आनंद शिंदे, ‘देवगड’ पर्यटनात महत्त्वाची भूमिका असलेले चारुदत्त सोमण, कोकणातील खाद्यसंस्कृती मुंबईत रुजविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सासू-सुना नयन खडापकर आणि देविका कोटिभास्कर कडापकर यांनाही यावेळी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण नाईक, मनसे नेते नितीन सरदेसाई, जत्रेच्या आयोजिका सुनिता वाडकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.

‘कोकण जत्रा’ महोत्सवात ‘अस्तित्व पुरस्कार २०२२’ स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना वाटेकर म्हणाले, गेल्यावर्षी चिपळूणला आलेल्या महापुरात विविध सामाजिक संस्थांनी सहकार्याचा हात पुढे करणाऱ्यांत ‘अस्तित्व ट्रस्ट’ एक होती. जत्रेला उपस्थित असलेल्या कोकणी माणसाने कोकण वाचायला समजून घ्यायला हवं आहे. आपल्या प्रत्येकाच्या गावाच्या आजूबाजूला कोणती समृद्धी आहे हे आपण माहिती करून घ्यायला हवं आहे. सध्याच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात आजासारखे ‘कोकण’चं ब्रँडिंग करणारे कार्यक्रम व्हायला हवे आहेत. वाशिष्ठी नदीमार्गे दाभोळखाडीस आणि पुढे समुद्रास जाऊन मिळणाऱ्या कोयनेच्या दैनंदिन ५.२३६ दशलक्ष घनमीटर इतक्या मोठ्या प्रमाणातील गोड्या अवजलाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या प्रकल्पाला मंजुरी देताना पंडित नेहरू यांनीही ‘या पाण्याचे करणार काय?’ असा प्रश्न उपस्थित केला होता याची आठवण करून दिली. कोकणातील निसर्ग आणि पर्यावरणाची हानी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कोकणातील कुलुपबंद घरे जनतेने पुन्हा एकदा उघडावीत, कोकणात परतावे असे आवाहन त्यांनी केले. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर एखादे धरण फुटावे तसे ट्रफिक या मार्गावरून प्रवास करणार आहे. या मार्गाद्वारे कोकण मुंबईसह थेट दिल्लीला जोडले जाईल आणि भविष्यात ‘औद्योगिक केंद्र’ बनेल. याबाबत कोकणशी नाळ जोडलेल्या प्रत्येकाने सतर्क राहावे, असे ते म्हणाले. रस्त्यांच्या अवस्था, शिक्षण आणि वैद्यकीय सोयींकडे झालेले दुर्लक्ष यांमुळे कोकणातल्या गावागावातून सतत स्थलांतर होत असते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षीही हेच चित्र आहे. हे बदल्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे वाटेकर यांनी सांगितले. हे चित्र बदल्यासाठी लागणारे हजारो कोटी रुपये उभे होतील अशा मोठ्या ‘ब्रेक’च्या शोधात कोकण आहे. हा ब्रेक जलवाहतूक आणि बंदर विकास यातून मिळणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्र किनाऱ्यावरील देशांत वाढलेल्या पर्यटनाच्या मुळाशी ‘पोर्ट डेव्हलपमेंट’ आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

वाटेकर यांना यापूर्वी भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राने उत्कृष्ठ जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यांनी विविध अभ्यासदौरे, निसर्ग, लेणी, पर्यटन अभ्यास, जंगलभ्रमण याकरिता हिमाचल, कन्याकुमारी ते अंदमान आणि भूतान पर्यंत प्रवास केला आहे. पर्यटन,पर्यावरण संवर्धन, बिगरमौसमी जंगलपेर अभियान, वृक्ष लागवड, बीजपेरणी अभियान, चंदन लागवड अभियान,पर्यावरण जनजागृती, रमणीय निसर्ग छायाचित्रण,ग्रंथालय चळवळ कार्यात त्यांचा सहभाग असतो. त्यांनी चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन ही ५ पर्यटनविषयक आणि ग्रामसेवक ते समाजसेवक,प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी, कृतार्थीनी या ३ चरित्र पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘गेट वे ऑफ दाभोळ’ आणि‘वाशिष्ठीच्या तीरावरून’ या दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती, ‘व्रतस्थ’ या पुस्तकाचे संपादन, सुमारे २५ हून अधिक विशेषांक, स्मरणिका, गौरव अंक आणि पुस्तिकांचे संपादन त्यांनी केले आहे. संदर्भीय कात्रणसंग्रह, संशोधन ग्रंथालय, ‘परमचिंतन’ अभ्यासिका आणि वस्तूसंग्रहालय आदी छंद जोपासणारे वाटेकर हे अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य सचिव असून चिपळूणातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेचे संचालक आहेत.

या सोहोळ्याचे सूत्रसंचालन मुंबईतील प्रसिद्ध ‘रेडिओ जॉकी’ (आरजे) किरण खोत यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.