चिपळूणच्या वाशिष्ठी नदीवरील नव्या पुलावरुन वाहतूक सुरु
गेल्या वर्षी सुरु झालेला पूल दुरूस्तीसाठी बंद; नवीन पुलाच्या चाचणीची प्रक्रिया सुरू
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाअंतर्गत वाशिष्ठी नदीवर उभारलेल्या दुसर्या पुलाच्या जोडरस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होताच या पुलावरून शुक्रवारपासून वाहतूक सुरू झाली आहे. पहिल्या पुलाची दुरूस्ती करण्यासाठी नवीन दुसर्या पुलाचे लोड टेस्टींग करण्याआधीच वाहतूक सुरू केली आहे. येत्या चार दिवसात ही लोड टेस्टींगची प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही पूल एकाचवेळी वाहतुकीसाठी सुरू होणार आहेत.
गतवर्षी 23 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन जुन्या पुलाचा जोडरस्ता वाहून गेला होता. त्यामुळे धोकादायक बनलेल्या या मार्गावर काही दिवस वाहतूक बंद ठेवावी लागली होती. या परिस्थितीमुळे चौपदरीकरणातील नवीन पुलाचे काम अतिशय घाईने करावे लागले होते. त्यासाठी 24 तास काम सुरू ठेवून व अतिरिक्त यंत्रणा वापरून हे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर 4 सप्टेंबर 2021 रोजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. या कामाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. काँक्रिटीकरणातील स्टील जागोजागी बाहेर पडल्याने वाहतूकदारांना धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी वाशिष्ठीच्या पहिल्या पुलावरील वाहतूक बंद ठेवून दुसर्या नवीन पुलावरून वाहतूक सुरू केली आहे. परंतु या पुलाची लोड टेस्टींग अद्याप झालेले नाही.
येत्या चार दिवसांत लोड टेस्टींगकरिता पुण्यातील यंत्रणा येथे दाखल होणार आहे. त्याचबरोबर पहिल्या पुलाचे दुरूस्तीचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे दोन्ही पूल एकाचवेळी वाहतुकीसाठी खुले होणार
आहेत.