चोरलेले इलेक्ट्रिक पाईप चोराने परत आणून ठेवले!
उरण दि 7(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील वशेणी दादर पूल विसर्जन घाटाकडे जाण्यासाठी भाविक व नागरिकांची सोय व्हावी म्हणून शासकीय निधीतून नुकताच एक सिमेंटचा विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता बनवला आहे. या रस्त्यावरून रात्री विसर्जन स्थळाकडे जाण्यासाठी विजेची सोय व्हावी म्हणून माजी गाव अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या सौजन्याने आठ जी आय पाईप उभे केले होते. दिवस भरात या पोलवर ईलेक्ट्रीक वायर व बल्ब बसवणार होते.मात्र ही वायर खेचण्यापूर्वीच वीजेचे पोल अज्ञात (समाजकंटक) इसमांनी चोरीला नेले होते.याबाबत सरपंच जीवन गावंड, ग्रामपंचायत सदस्य व माजी गाव अध्यक्ष अविनाश पाटील यांनी याची पहाणी केली होती. पाहणी नंतर या बाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली होती.
दि. 29/8/2022 रोजी अंदाजे पंधरा हजार रुपयाचे चोरीला गेलेले पाईपलाईन दिनांक 6/9/2022 रोजी रात्री चोराने वशेणी दादर पुलाखाली आणून सोडले.चोराने चोरी करून परत सामान त्याच ठिकाणी ठेवण्याची अशी घटना उरण मध्ये प्रथमच घडली आहे.खरतर समाज उपयोगी कामात वापरलेल्या पोलांची चोरी होते.ही बाब समाजाच्या दृष्टीने निंदनीय व दुर्दैवी आहे.अशा जर चो-या झाल्या तर समाज सुधारणा करायच्या कशा, असा प्रश्न सामाजिक कार्य करणा-या सामाजिक कार्यकर्त्यांना पडला आहे.