दापोली :येथील कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानमार्फत संपूर्ण कोकणातील युवकांसाठी प्रेरणादायी अशा अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
युवा प्रेरणा कट्टा ही एक कार्यक्रम मालिका आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील यशस्वी आणि प्रसिद्ध युवा मान्यवर कट्यावर येणार असून, त्यांच्यासोबत दापोली आणि परिसरातील युवकांना मनमोकळा संवाद साधण्याची, मार्गदर्शन घेण्याचे एक खुले व्यासपीठ आहे.
पहिल्या युवा प्रेरणा कट्ट्यावर पाहुणे म्हणून, सुप्रसिद्ध चितळे उद्योग समूहाचे प्रमुख इंद्रनील चितळे उपस्थित होते. चितळे यांच्याशी संवाद साधण्याची धुरा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन, संदीप गरांडे, अनन्या वैशंपायन यांनी पार पाडली.
संवादकांच्या प्रश्नांना अगदी मनमोकळी आणि खुमासदार उत्तरे देत, इंद्रनील चितळे यांनी तरुणांना समजेल अशा भाषेत स्थानिक उद्योजकतेच्या संधींपासून ते जागतिक अर्थव्यवस्था, भारताचे अर्थकारण पर्यंत विषयांना हात घातला.. विशेषतः एक उद्योजक म्हणून यशस्वी होत असताना कोणत्या तत्व ते पाळतात, कोणत्या गोष्टी संभाळव्या लागतात याबद्दल देखील त्यांनी भाष्य केले.
तुमच्या व्यवसायाचे वर्क कल्चर, तुमचे टार्गेट्स,योग्य संधी, भारतात मुबलक मार्केटची उपलब्धता या सगळ्याची सांगड घालत कोकणातील तरुणांनी व्यवसायात यावे तर कोकण सुद्धा प्रचंड प्रगत होईल असे मत यावेळी व्यक्त केले.
मिहीर महाजन यांनी कार्यक्रमाची सांगता करताना म्हंटले की हा कट्टा प्रेरणादायी अनेकांच्या आयुष्यातील प्रेरणादायी टर्निंग पॉईंट सुद्धा ठरू शकतो. प्रत्येक 3 महिन्यानंतर अशा कट्ट्यावर नवीन विषय आणि नवीन पाहुण्यांना बोलावण्याचा मानस आहे.
युवा प्रेरणा कट्याचे आयोजन समितीमध्ये तरुणांची मोठी फळी असल्याचे पाहायला मिळाले, विशेषतः CA कौस्तुभ दाबके, ADV अभिजित परांजपे, वेदांग शितुत, तन्मय प्रसादे, डॉ.प्रणाली माने, श्रेयस जोशी, डॉ.रवी पवार, श्रवण दांडेकर, परेश बुटाला, रिया केतकर, ऋजुता जोशी, किरण बांद्रे, रोहन भावे, सुयोग गोडबोले ई. अनेक कार्यकर्ते सहभागी होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच, प्रतिष्ठानच्या वेबसाईटचे विमोचन करण्यात आले, विशेषतः यामध्ये ब्लड ग्रुप ई डिरेक्टरी चा समावेश आहे. एका क्लिक वर आपल्या परिसरातील, आपल्याला आवश्यक त्या ब्लड ग्रुपच्या रक्तदात्यांची सूची आपल्याला मोफत उपलब्ध होणार आहे.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |