Ultimate magazine theme for WordPress.

देवराई, देवकं वृक्ष आणि हेरिटेज ट्री’ यावर काम व्हायला हवं

0 63

पर्यावरण परिषदेत धीरज वाटेकर  यांचे मत

चिपळूण :: देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाऊन मानवी समाजाने परंपरेने राखलेले वन ‘देवराई’, ज्याच्या मुळशी आपली ‘कुलदेवता’ वास करते ते ‘देवक’ वृक्ष आणि राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात असलेल्या ४०-५० वर्षांहून अधिक वयाच्या वृक्षांना ‘हेरिटेज ट्री’ संबोधून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनावर काम व्हायला हवं अशी विनंती येथील पर्यावरण आणि पर्यटन विषयातील कार्यकर्ते, लेखक धीरज वाटेकर यांनी केली.

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया (एन.जी.ओ.) बारामती आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) महाराष्ट्र राज्य यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बारामती येथे आयोजित केलेल्या पर्यावरण अभ्यास दौऱ्यातील पर्यावरण परिषदेत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार, श्री. रोकडे, अॅड. निलिमा गुजर, पर्यावरण मंडळाचे सल्लागार ‘जलदूत’ राज देशमुख, अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे आदी उपस्थित होते. वाटेकर यांनी परिषदेतील आपल्या मनोगतात पर्यावरण मंडळ आणि एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात केलेल्या आणि सर्वदूर परिचित असलेल्या कामाची मांडणी केली. हे पर्यावरणीय कार्य पाहाण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार आणि पर्यावरण मंडळाचे सल्लागार राज देशमुख यांच्याप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.फोरमने यंदा ‘वसुंधरा पुरस्कार’ प्रदान केलेल्या वन्यजीव बचाव क्षेत्रातील कार्यकर्त्या नेहा पंचामिया आणि ‘बारामती आयकॉन’ पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. Only One Earth’ हे यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे घोषवाक्य आणि ‘सेव्ह अर्थ सेव्ह लाईफ’ ही टॅगलाईन घेऊन काम करणारी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या एकरूपतेचा अपूर्वयोग जुळल्याचे ते म्हणाले. शाश्वत विकासासाठी सुजाण पिढीला ज्ञान, कौशल्ये, दृष्टिकोन आणि मूल्ये प्राप्त करण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्याचे काम येथे होत आहे. पर्यावरण संरक्षण, ऊर्जा, संवर्धन आणि शाश्वत विकासाशी संबंधित समस्यांबद्दल समाजात जागरूकता वाढवणे आणि विकासाच्या नियोजनात पर्यावरणीय प्रभाव निर्माण करणे. मनुष्य समुदायाच्या अंगभूत क्षमता वाढवून भारताला जगातील एक समृद्ध देश बनवण्याचे काम येथे होत आहे. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ’ हेही पर्यावरणाच्या क्षेत्रात ‘शिक्षक’ या महत्त्वाच्या घटकाला समोर ठेवून जनजागृतीचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष स्वर्गीय वृक्षमित्र आबासाहेब मोरे हे सतत पर्यावरणाचा विचार करणारे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते. निसर्ग आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समूहाला वैचारिक स्तरावर अधिकाधिक सक्षम राहाण्यासाठी आबासाहेब सातत्याने प्रयत्नशील असत. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ केलेल्या कार्याचा वारसा पर्यावरण मंडळ पुढे चालवत असल्याचे वाटेकर म्हणाले. मंडळाची पर्यावरण संमेलने आणि भूतान आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे पर्यावरणीय जनजागृतीच्या क्षेत्रात कार्यरत समूहाला वैचारिक पातळीवर ज्ञानार्जन देणारे उपक्रम म्हणून नोंदवले गेल्याचे ते म्हणाले. मंडळाच्या आगामी शिर्डी संमेलनासाठी फोरमच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली. जीवन जगताना ‘अडथळ्यांची शर्यत’ पार करण्याची प्रेरणा हे काम पाहिल्यावर मिळते. बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क मधील महिलांची लक्षणीय संख्या, देशातील पहिले इको-व्हिलेज म्हणजे पर्यावरणीय गाव मॉडेल असलेल्या काटेवाडीतील कामामागे असलेले ‘शिस्त आणि स्वच्छता’ हे दोन महत्त्वाचे पर्यावरणीय पैलू, ‘बाळा तुझ्यासाठी कायपण’ म्हणणारी मातीला विसरलेल्या मनांना पुन्हा मातीची आठवण करून देणारी इथली ‘मातीतल्या खेळांची जत्रा’, बारामती परिसरातील विविध वनक्षेत्रातील पाणवठ्यांमध्ये वन्यजीव प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी सोडण्याचे उपक्रम, विहिरांचे जलपूजन, वृक्षलागवडीत वड, पिंपळ, काशीद, कांचन, करंज, शिसम, अर्जुन, ताम्हण, सीताफळ, जांभूळ, चिंच, आंबा आदी स्थानिक प्रजातींना मिळणारे अनुकरणीय प्राधान्य, अवर्षणग्रस्त भागातील भूजलपातळी वाढविणारा मेघदूत प्रकल्प, नीरा डावा कालवा व कऱ्हा नदी स्वच्छता मोहीम, फोरमतर्फे कोरोना काळात सुरु झालेले आणि ज्ञानाच्या खजिन्याची शिदोरी असलेले सॅटर्डे वेबिनार पर्यावरणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ‘बौद्धिक टॉनिक’चं काम करत असल्याचे वाटेकर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी, ‘पर्यावरण जपलं तर आपण जगणार आहोत. त्यामुळे पर्यावरणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून वेळ काढावा’, असे आवाहन केले. बारामतीला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाबद्दल आभार मानले. पर्यावरण मंडळाच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध सूचनांची दखल घेतली जाईल असे त्या यावेळी म्हणाल्या. ‘देवराई’ प्रकल्पासंदर्भात फोरम विचार करणार असल्याचे यावेळी सुनेत्राताई पवार यांनी सांगितले. पर्यावरण परिषदेत सहभागी झालेल्यांना सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.