Ultimate magazine theme for WordPress.

देशातील अनोखा क्रांती स्तंभ रत्नागिरीत !

0 44

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करबुडे येथे उद्या लोकार्पण

रत्नागिरी : देशातील एकमेव मुद्रांकित क्रांती स्तंभ रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे उभारण्यात आला आहे. या दीक्षाभूमी क्रांती धम्म स्तंभाचा मंगळवार दि.१७, मे रोजी सकाळी ९ वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे. लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती बौद्ध दीक्षा भूमी विकास समितीचे अध्यक्ष अमोल जाधव व मुंबई अध्यक्ष अनिल जाधव यांनी दिली आहे.

६५ वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांनी करबुडे येथे रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांना बौध्द धम्माची दीक्षा दिली. यामधे रत्नागिरी तालुक्यातील निवळी, भोके, फणसावळे, आडोब, केळ्ये, वेतोशी, जांभरूण, खरवते, करबुडे या गावातील लोकांना दि. १६ मे १९५७ साली सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि भदंत आनंद कौशल्यानंद यांच्या अधिपत्याखाली बौद्ध धम्माची दीक्षा याच स्तंभाच्या ठिकाणी देण्यात आली. त्या नंतर बौध्द दीक्षा भूमी विकास समिती या संघटनेच्या तब्बल ६५ वर्षांच्या अविरत प्रयत्नांनी बौद्ध दीक्षा भूमी क्रांतीस्तंभ उभारण्याचे काम पूर्ण झाले. हा क्रांतिकारी स्तंभ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव अशोक मुद्रांकित स्तंभ म्हणून ओळखला जाणार आहे. स्थापत्य कलेतील विशिष्ठ शैलीत हा धम्म क्रांती स्तंभ उभारण्यात आला आहे. यामध्ये पांढऱ्या अंबाजी व पांढऱ्या व्हिएतनाम मार्बलचा वापर करून संपूर्ण स्तंभाचे काम करण्यात आले आहे.

देशातील अनोखा आगळा वेगळा स्तंभ रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे पाहायला मिळणार आहे. ही रत्नागिरीकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

या एतिहासिक लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बहुसंख्येने एतिहासिक लोकार्पण सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन दीक्षा भूमी विकास समितीचे स्थानिक सचिव महेश सावंत यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.