पाचव्या पिढीनेही जपली मूर्तिकला
संगमेश्वर ( सचिन यादव ) : तालुक्यातील धामणी गावातील लिंगायत बंधूंच्या गणेश चित्रशाळेने गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा १३० व्या वर्षी देखील जपली आहे. लिंगायत यांची पाचवी पिढी देखील हा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहे.
या गणेश चित्रशाळेत स्वतः मालक शिवाजी लिंगायत यांच्यासह त्यांचे तीन मुलगे दोन नातू मूर्ती तयार करण्यात व्यस्त असतात. शिवाजी लिंगायत वयाच्या नव्वदित सुध्दा स्वतः मातीच्या मूर्ती घडवून त्यांवर कलाकुसर करण्याचं काम करतात.
खासकरून मातीच्या मूर्ती कोणत्याही साच्याचा वापर न करता ते हाती हाती मूर्ती साकारतात. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक मागणी असते.
शिवाजी लिंगायत यांची पाचवी पिढी सुध्दा यामध्ये उत्साहाने सहभागी आहे.
वयाच्या १५ व्या वर्षी शिवाजी लिंगायत यांनी बाप्पाची मूर्ती साकारु लागले
शिवाजी लिंगायत यांचें वडील बाळशिंग गोपीलिंग लिंगायत हे सुद्धा गणपतीची मूर्ती साकारत होते. त्यांच्या आजोबा पंजोबापासून हा कारखाना सुरू आहे.
पूर्वी आतासारखी कोणत्याही प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध नसल्याने रंगकामाला चक्क गवताच्या काड्यांचा वापर करून मूर्तीवर रंगकाम केले जायचे. सध्या त्यांच्याकडे ३०० ते ३५० मूर्त्या आहेत. शिवाजी लिंगायत यांचें मुलगे उदय,उमेश, उल्हास हे सुद्धा मूर्ती साकातात.
उदय लिंगायत हे रत्नागिरीमध्ये शिर्के हायस्कूल येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुट्टीच्या दिवशी ते सुद्धा आपल्या वडीलांना हातभार लावत असतात.
लिंगायत यांची पाचवी पिढी त्यांचें नातू प्रथमेश,विनय हे सुद्धा सहभाग घेतात. प्रथमेश लिंगायत हा उत्कृष्ट चित्रकार म्हणून नावलौकिक आहे. तो सध्या सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेत कलेचे शिक्षण घेत आहे.
शिवाजी लिंगायत यांना गावात आण्णा या नावाने ओळखले जाते. गेली कित्येक वर्षे ते पोस्टात नोकरी करत होते .
निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला या कलेत वाहून घेतले .
नमन कलेला लागली जाणारी लाकडी गणपती, घोडा इतर वस्तू ते स्वतः तयार करून वयाच्या नव्वदित देखील तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कामं करतात.