जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्याकडून गौरव
नाणीज : नाणीज ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. येथील विशेष ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. असा निर्णय घेणारी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज ही पहिली ग्रामपंचायत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींना विधवा प्रथा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसे परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. त्यापार्श्वमूमीवर नाणीजला आज खास सभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
असा निर्णय घेणारी जिल्ह्यातील पहिलीच नाणीज ग्रामपंचायत आहे. तिने ही ग्रामसभा घेऊन ही प्रथा मोडीत काढली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गौरव संसारे होते.
या ग्रामसभेला सुमारे दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या. त्याचबरोबर पुरुषांची मोठी उपस्थिती होती. या ग्रामसभेला रत्नागिरी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, रत्नागिरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे. पी. जाधव, गटविकास अधिकारी पी. एन. सुर्वे; प्राजक्ता शिरधनकर उपस्थित होत्या.
त्याचबरोबर नाणीजचे सरपंच गौरव संसारे, ग्रामसेवक आशिष खोचाडे; उपसरपंच राधिका शिंदे, गावचे पोलीस पाटील नितीन कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विनायक शिवगण, दत्ताराम शिवगण, विजय गावडे, संध्या गुरव, अनुजा सरफरे, पूजा पंडित, संजना रेवाळे, माजी सरपंच सुरेंद्र सावंत, दत्ताराम खावडकर, महिला संघटक भूमी सावंत, माधुरी कांबळे, स्वाती कांबळे, प्रतिभा रेवाळे, मेघा गुरव, आर्या गुरव, दीपिका खावडकर, राजन बोडेकर, रवींद्र दरडी, माजी ज्येष्ठ सरपंच नारायणराव सावंत, माजी पंचायत समिती सदस्य दाक्षायणी शिवगण रेश्मा बावडेकर ,नानिज सोसायटीचे चेअरमन प्रकाश कांबळे उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने समाजात प्रचलित असलेल्या ‘अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन’ या महाराष्ट्र शासनाच्या जी.आर. प्रमाणे नाणीजमध्ये सर्व ग्रामस्थांमध्ये आणि वाड्यां- वस्त्यांवर जाऊन जागृती केली. ही अनिष्ट प्रथा कशी आहे याबाबत प्रबोधन केले आणि आज या ठिकाणी विशेष ग्रामसभा घेऊन सर्वानुमते ठराव मंजूर केला. या अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्यात आली.
या प्रसंगी इंदुमती जाखडे म्हणाल्या, “नाणीज ग्रामपंचायतीचा विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय अतिशय स्तुत्य आहे. त्याचे अनुकरण जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी करावे.
गटविकास अधिकारी जे पी जाधव यांनीही आपले विचार व्यक्त केले त्याचप्रमाणे या ग्रामसभेत अनेक महिलांनीही याबाबत आपले परखडपणे विचार मांडले या सभेचे सूत्रसंचालन ग्रा प सदस्य विजय गावडे यांनी केले,
या उपक्रमाचे मंत्री उदय सामंत यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनीही याउपक्रमास आशीर्वाद दिले.