Ultimate magazine theme for WordPress.

नाणीज येथे स्कूलबसवर विद्युत खांब कोसळला

0 49

नाणीज दि. ११ : नांदिवली ता. लांजा येथून नाणीज येथे दररोज विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर (क्रमांक :एमएच०८ एपी १२८६) सोमवारी येथे सकाळी नऊच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेला विद्युत खांब कोसळला. तो बसच्या बॉनेटवर पडला. त्यात सुदैवाने  कोणालाही विद्यार्थ्यांना इजा झाली नाही. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. हे सर्व विद्यार्थी माध्यमिक विद्यामंदिर नाणीज येथे शिक्षणासाठी  नांदिवली  भागातून येतात. बाजारपेठ येथील प्राथमिक शाळेसमोरील विजेचा खांब गेले कित्येक दिवस धोकादायक बनलेला होता. पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. तेच आज विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले होते. पण सर्वांचे दैव बलवत्तर म्हणून गाडीच्या पुढच्या भागावर हा खांब  आदळल्यामुळे मागे बसलेल्या  विद्यार्थ्यांना इजा झाली नाही.

चालक प्रशांत पांचाळ यांनी  प्रसंगावधानाने गाडी वेळेत थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.  आता तरी महावितरणने रस्त्याच्या जवळील, तसेच गावातील धोकादायक विजेचे खांब यांचा सर्व्हे करावा व ते हटवावेत.   जोराच्या पावसामुळे, वाऱ्यामुळे हे  खांब कोसळण्याच्या घटना नेहमी घडत आहेत.रस्त्याकडेचे खांब अनेक वर्ष आहे तसेच आहेत. ते गंजलेले आहेत. त्यामुळे थोड्या वाऱ्या-पावसाने सुद्धा  उन्मळून पडतात. महावितरण अजून किती दिवस लोकांच्या जीवाशी खेळणार आहे, असा प्रश्न लोक विचारीत आहेत.

दरवर्षी अपघात होतात पण तात्पुरते उपचार केले जातात. वर्षभरासाठी सर्व्हे केला जात नाही.  कंत्राटी पद्धतीने कामे केली जातात. त्यात दर्जा नसतो.दरम्यान विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस वर खांब कोसळल्याची  वार्ता परिसरात  वाऱ्यासारखी पसरली. पालक घाबरून गेले. अनेक पालकांनी घटनास्थळी धाव घेतली.  अपघातानंतर अनेक तरुण मदतीला धावले. त्यांनी खांब  बाजूला केला.  बसला मोकळे करण्यात आले.  नाणीज येथील काही तरुण विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबस वर काम करीत असतात. ते मदतीला आले.  नाणीज येथे रस्त्याच्या कडेला अनेक जुनाट वृक्ष आहेत. ते सतत कोसळत असतात.रविवारी अशाच पद्धतीने एक झाड ग्रामपंचायत समोर पडले होते. ते नाणीज येथील तारी बंधू बाजूला करत होते. हा खांब  कोसळल्यानंतर दुसरे झाडे तेथे कोसळले. सुदैवत तारी बंधू आणि बाकीचे नागरिक वाचले.फोटो ओळी-नाणीज येथे सोमवारी सकाळी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विद्युत खांब कोसळला. त्यात बॉनेट चेपलेली बस. शेजारी रस्त्यावर पडलेले झाड. (छाया राजन बोडेकर)

Leave A Reply

Your email address will not be published.