ना. रवींद्र चव्हाण यांच्या सत्कार समारंभात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
उरण दि 28(विठ्ठल ममताबादे ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. विविध योजनाच्या माध्यमातून विकासाची गंगा घरा घरात पोहोचली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरु असून गोरगरिबांना भाजपच न्याय देऊ शकतो. महाविकास आघाडीने अनेक चुका केल्या. महाविकास आघाडीमुळे प्रगती खुंटली पण भाजपने विकास साधला. त्यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहोचले पाहिजे, असे मत ना. रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे गट व भाजपचे सरकार स्थापन होताच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री पदी ना. रविंद्र चव्हाण यांची वर्णी लागली. आ. रविंद्र चव्हाण यांचा मंत्री झाल्यानंतर उरण मध्ये प्रथमच भव्य दिव्य असा सत्कार करण्या हेतू भारतीय जनता पार्टी उरणच्या वतीने रविवारी दि 28 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वा. जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल, उरण येथे आ. रविंद्र चव्हाण यांचा सत्कार समारंभ आणि सर्वपक्षीय पक्ष प्रवेश सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.यावेळी रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी उरणच्या विकासकामांना कोणतेही निधी कमी पडू देणार नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री म्हणून जास्तीत जास्त निधी मी देण्याचा प्रयत्न करेन असे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले.
आ. महेश बालदी यांनी ना.रवींद्र चव्हाण यांच्या सत्कार प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश बालदी यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली. खरे गद्दार उद्धव ठाकरे हेच आहेत. भाजपशी युती तोडली त्यामुळे ते खरे गद्दार आहेत. महाविकास आघाडीच्या विविध ध्येय धोरणावर टीका करत कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे ठेवी परत मिळवून देण्याचे महेश बालदी यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.
आ. प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील यांच्यावर टीका केली. हजारो लोकांचे पैसे बुडविले त्यांचे बॅनर वर फोटो लागत आहे. चुकीचे काम केलेल्या व्यक्तीचे फोटो बॅनर वर लागत आहे. चांगले काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नितीन गडकरी यांनी केले देशाचे नाव उज्ज्वल केले. असे सांगत भाजपच्या माध्यमातून सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात ना. मंत्री रविंद्र चव्हाण यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले बघायचे आहे. माझे हे स्वप्न आहे.रविंद्र चव्हाण हे उत्तम काम करीत आहेत या अगोदर पालकमंत्री होते तेंव्हा त्यांनी उत्तम काम केले होते.त्यामुळे रायगड जिल्ह्यात आताही तेच पालकमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांनी यावेळी प्रगट केली. व भाजप पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना आदी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते हे पक्षाशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहून सुद्धा त्यांच्यावर वर्षानुवर्षे अन्याय झाला आहे. एकनिष्ठ, प्रामाणिक राहून सुद्धा या कार्यकर्त्यांची गोची होत होती. पाहिजे तसा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मान सन्मान होत नव्हता. पक्षात राहून सुद्धा कोणतेही कामे होत नसल्याने उरण विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शिवसेना आदी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये जाहीरपणे पक्ष प्रवेश केला.शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उद्योजक विकास भोईर, धुतुम ग्रामपंचायतचे सरपंच रेश्मा ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर यांच्यासह पनवेल उरण मधील विविध गावातील सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीरपणे पक्ष प्रवेश केला.
यावेळी ना. रविंद्र चव्हाण,माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील,पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालूकाध्यक्ष रवीशेठ भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत,उरण नगर परिषदेचे नगराध्यक्ष सायली म्हात्रे, नगरसेवक कौशिक शहा, राजू ठाकूर, राणी म्हात्रे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.