उरण दि 25(विठ्ठल ममताबादे ) : दिनांक 24/08/2022 रोजी 17.30 ते 19.15 वा. दरम्यान आनंदी हॉटेल सभागृह, कोटनाका, उरण येथे सार्वजनिक गणेश उत्सव 2022 निमित्त उरण पोलीस ठाण्याचे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता कमिटी, पोलीस पाटील, सरपंच, सागरी सुरक्षा रक्षक दल यांची बैठक घेण्यात आली.यावेळी नियमांचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गणेशोत्सव मंडळाना केले.
या बैठकीमध्ये आगामी गणेशोत्सव शांततेत व मोठ्या उत्साहात पार पडण्याच्या अनुषंगाने शिवराज पाटील पोलीस उप. आयुक्त, परीमंडळ 02 पनवेल, धनाजी क्षीरसागर सहा. पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांनी शासन परिपत्रकानुसार गणेशोत्सव मंडळाना, उपस्थितांना मार्गदर्शन करून खालील प्रमाणे सूचना दिल्या. गणेशोत्सव मंडळाना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले.
नियम खालीलप्रमाणे
1) देशातील जातीय स्थितीचा विचार करून बाहेरून येणारे शक्ती कडून व समाज कंठका कडून विघातक कृत्य करण्याची शक्यता असल्याने आपले स्वयंसेवक नेमावे, देखावा पाहण्यासाठी येणारे महिला व पुरुष यांच्या वेगवेगळया रांगा कराव्यात.
2)गणपती स्थापना व विसर्जन करताना मंडळातील सदस्यांमध्ये वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी.
3) ध्वनीची मर्यादा पाळून ध्वनी प्रदुषण होणार नाहीं याची दक्षता घ्यावी. डी जे धारकाने शासनाने दिलेल्या ठराविक मर्यादा पाळावी .
4) विसर्जनाच्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज नसल्याने विसर्जनासाठी ज्यांना पोहता येत नाही त्यांना परवानगी देऊ नये.
6)रात्रीच्या वेळी मूर्तीचे नुकसान होऊ नये यासाठी रात्रीसाठी स्वंयसेवक नेमावे.
7) विद्युत रोषणाई करताना रोषणाई करणारा परवाना धारक आहे का याबाबत खात्री करावी ,त्यास वेळोवेळी विद्युत रोषणाई तपासून जाण्याबात सूचना द्याव्यात.
8)कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे, फलक व चित्रफिती करू नये. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना योग्य ती काळजी घ्यावी.
9) एक खिडकी योजना राबविण्यात यावी यासाठी ज्या ठिकाणी सदरची योजना राबविली जात आहे ,तेथील माहिती घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या.
10)रस्ता दुरुस्तीबाबत संबंधिताना सूचना देण्यात आल्या.
11)एम एस ई बी च्या अधिकारी यांनी ओव्हर हेड वायर बाबत व लाईट सुरळित करणेबाबत योग्य ते नियोजन करावे.
12)अग्निशामक दलाने देखील योग्य ते नियोजन करावे.
13)पोलिसांनी परवानगी देताना पडताळणी करून परवानगी द्यावी.
14)कोणताही अनुचित प्रकार अथवा बेवारस वस्तू व व्यक्तीच्या संशयित हालचाली निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
15) पोलीस मदतीसाठी डायल 112 क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करावा.
बैठकीमध्ये उपस्थितांच्या अडी-अडचणी समजावून घेवून त्यांचे संबंधित विभागाच्या अधिका-या मार्फत निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.सदर बैठकीस शिवराज पाटील पोलीस उप आयुक्त परि मंडळ-2 पनवेल, धनाजी क्षिरसागर सहा.पोलीस आयुक्त पोर्ट विभाग,मुख्याधिकारी संतोष माळी उरण नगर परिषद, नायब तहसीलदार नरेश पेढवी उरण, द्रोणागिरी अग्निशमन दलाचे अमित कांबळे, कार्यकारी अभियंता विजय सोनावले एम.एस.ई.बी कार्यालय उरण, व.पो.निरी.न्हावाशेवा मधूकर भटे, पो.निरीक्षक गायकवाड उरण वाहतूक शाखा यांचेसह शांतता कमिटी व मोहल्ला कमिटी सदस्य, गणपती मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, महिला दक्षता कमिटी सदस्य, सागरी सुरक्षा रक्षक दल, पत्रकार असे 125/150 लोक उपस्थित होते. सदरची बैठक शांततेत पार पडली.