https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दापोलीत निघाली सायकल फेरी

0 67

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनी उपक्रम

दापोली : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या परिचारिकांच्या योगदानाचं स्मरण करुन, त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी, १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. परिचारिका रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची अहोरात्र सेवा करत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचं, त्यांना आनंद देण्याचं महत्त्वाचं कार्य त्या करत असतात. कोरोनासारख्या संकटकाळात तर परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत असाधारण कार्य करणाऱ्या परिचारिकांचं कौतुक आणि आभार मानण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी १५ मे २०२२ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते.

या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली – नॅशनल हायस्कूल- काळकाई कोंड आमराई – नशेमन कॉलनी- आझाद नगर – खोंडा- फिश मार्केट- उपजिल्हा रुग्णालय दापोली- आझाद मैदान असा ६ किमीचा होता. उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे परिचारिकांचे आभार मानण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातलं परिचारिकांचे योगदान आणि सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय आरोग्य सेवा अपूर्ण आहेत. या प्रसंगी वैद्यकिय अधिक्षक डॉ महेश भागवत, इनचार्ज सिस्टर निर्मला जाधव, अनघा घाग, दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ किशोर जाधव, अधिपरीचारीका साक्षी हांडे, प्रिया वंडकर, गायत्री भाटकर, स्नेहल गोकणे, जोगेश्वरी वळवी, निकिता घुगरे, अर्चना वसावे, स्वप्नाली दाभोळकर, मालिनी वसावे, दिपीका नांदगावकर आणि सहकारी उपस्थित होते. त्यांनी निरोगी आरोग्यासाठी शरीराची, अवयवांची स्वच्छता, काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केले. सायकल फेरी झाल्यावर काही सायकलस्वारांनी उपजिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या शिबिरात रक्तदानही केले.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्यपणे सायकल फेरीचे आयोजन केले जाते. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, पराग केळसकर, सुरज शेठ, प्रशांत पालवणकर, झाहीद दादरकर, अमोद बुटाला इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.