Ultimate magazine theme for WordPress.

पर्यावरण व मानव रक्षणासाठी काँग्रेस प्राणपणाने लढेल : नाना पटोले

0 45

भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पर्यावरण रक्षणाशिवाय पर्याय नाहीः बाळासाहेब थोरात

पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेलः अशोक चव्हाण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ

मुंबई : विकास साधताना पर्यावरणाचं भान ठेवले पाहिजे. असमतोल विकास हानिकारक ठरू शकतो. शेतकरी, कामगार आदींवर पर्यावरण बदलाचा परिणाम होत आहे. केंद्रातील भाजप सरकार आपल्या काही उद्योगपती मित्रांना खुश करण्यासाठी पर्यावरण कायद्याला धाब्यावर बसवून जल-जंगल आणि पर्यावरणाची हानी करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणारी काँग्रेस पर्यावरण व मानव रक्षणासाठी प्राणपणाने लढेल असे महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाने बदलते हवामान व तापमान वाढ यासंदर्भात दोन दिवसीय पर्यावरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्री बाजीराव खाडे,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार अमर राजूरकर, सरचिटणीस डॉ. गजानन देसाई, दिपक परुळेकर आणि पर्यावरण विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरत म्हणाले की, भावी पिढ्यांना चांगले भवितव्य द्यायचे असेल तर पर्यावरणाच्या रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्लोबल वार्मिंग, कार्बन उत्सर्जन हे संपूर्ण जगासमोरील सर्वात मोठे संकट आहे. काँग्रेस पक्षाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली राजकारणासोबतच पर्यावरण रक्षणाचे काम सुरु आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. राजकारण, आरोप- प्रत्यारोप चिखलफेकीच्या काळात हे अत्यंत सकारात्मक आणि चांगले काम काँग्रेस पक्ष करत आहे याचा समाजात चांगला संदेश जाईल.  

यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, फक्त राजकीय विषयांपुरती आपली बांधिलकी नाही तर संपूर्ण मानवजातीचे कल्याण या उद्देशाने काँग्रेस पक्ष काम करत आहे. तापमानवाढीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. उष्माघाताने प्राणी आणि माणसांचे मृत्यू होत आहेत ही धोक्याची घंटा आहे. फक्त हवेचे प्रदूषणच नाही तर सध्या देशात वैचारिक प्रदूषण ही वाढत आहे ती सुद्धा धोक्याची घंटा आहे.

यावेळी बोलताना जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, पर्यावरण हा मानवी जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. कार्यकर्ते घडविण्यासाठी मते मिळवण्यासाठी राजकीय पक्ष शिबिरे घेतात पण पर्यावरण रक्षणासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे प्रशिक्षण शिबिर घेतले जात आहे त्याबद्दल मी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.

महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभागद्वारे हे नाविन्यपूर्ण शिबिर आयोजित केले आहे. शिबिरासाठी पर्यावरण विभागाचे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ प्रा. सागर धारा आणि भारतीय पर्यावरण चळवळीचे ऍड. गिरीश राऊत यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.