Ultimate magazine theme for WordPress.

पाऊस आला उद्यावर… आरवलीतील सर्व्हिस रोड मातीचाच !

0 55

चौपदरी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गवरील आरवली येथील फ्लाय ओव्हरची स्थिती

खडीकरणासह डांबरीकरणाचाही नाही पत्ता

चिमुकल्यांच्या शाळेजवळ अंडरपासचाही विसर!

ना ठेकेदार कंपनीला चिंता, ना लोकप्रतिनिधीना फिकीर!

आरवली : आरवली ता. संगमेश्वर येथील चौकात महामार्ग चौपदारीकरणाचे काम जोरात सुरू झाले असले तरी सर्व्हिस रोड पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार आहे. सर्व्हिस रोडचे खडीकरण आणि मजबुतीकरण न झाल्यास प्रवासी वाहतुकीचे तीन तेरा वाजणार आहेत. तसेच महामार्गावरील वाहतुकीस धोकादायक ठरणारे आहे. बाजारपेठेतील फ्लायओव्हरपासून काही अंतरावर असलेल्या चिमुकल्यांच्या शाळेचाही महामार्गाचे काम करताना पूर्णपणे विसर पडल्याचे दिसत आहे. शाळेसमोर अंडरपास उभारायचा राहून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. माखजन आणि कुचांबेकडे जाण्यासाठी बायपासचे काम सुरू आहे. यासाठी दोन्ही बाजूनी सर्व्हिस रोड काढण्यात आले आहेत. या सर्व्हिस रोडच्या मातीवर पाणी मारण्यात येत नसल्याने लोकांच्या डोळ्यात धूळ जात असून येथील व्यापारी आणि प्रवासी धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. मात्र ठेकेदाराकडून कोणतीच दखल घेण्यात येत नाही ही वस्तुस्थिती आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम व्यवस्थित व तातडीने होऊन प्रवाशांचे हाल थांबावेत रस्ता मंजूर आरेखन आणि नकाशानुसार केला जात नसल्याने याबाबत न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
आरवली येथे बाजारपेठेतून जाणाऱ्या महामार्गावर फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहे. यामुळे व्यापारी तसेच छोटेमोठे दुकानदार यांचा व्यवसाय उध्वस्त होणार आहे. सुरवातीला जमिनीचे संपादन करण्यात आले होते त्यापेक्षा अधिक जागेवर काम सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. याबाबत काही दुकानदार व्यापाऱ्यांनी ठेकेदार कंपनीच्या लोकांना विचारले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
महामार्गाच्या कामासाठी जो प्लॅन तयार करण्यात आला त्या प्लॅन अनुरूप काम व्हायला हवे होते. मात्र आता प्लॅननुसार काम होत नसल्याचे होणाऱ्या कामावरून दिसून येत आहे. ठेकेदार रस्त्याच्या कामासाठी वापरत असलेली खाडीही निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. याबाबत शासनाच्या वरिष्ठ क्वालिटी कंट्रोलर यांच्याकडे कडी चाचणीसाठी पाठवण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता व रॉयल्टी न भरता ठेकेदार मातीचे उत्खनन करत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. ठेकेदार कंपनी म्हसुलचे नियम पायी तुडवताना दिसत असताना शासनाचे महसूल अधिकारी याबाबत कारवाई का करत नाहीत असा सवाल विचारला जात आहे.
आरवली येथे सध्या सूरु असलेले महामार्गाचे काम हे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांसाठी धोकादायक आहे. चौकात जी उपाययोजना करायला हवी होती ती करण्यात न आल्याने हे ठिकाण सध्या वाहतुकीसाठी धोकादायक जीवघेणा झाला आहे. आरवली हे परिसरातील चाळीस-पन्नास गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी दिवसभर गर्दी वर्दळ असते. आता पावसाळा तोंडावर असल्याने प्रशासनाने याबाबत दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.