Ultimate magazine theme for WordPress.

पाऊस, भूस्खलन आणि आपली सुरक्षा

0 40

दरड प्रवण परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने समिती स्थापन करावी व पर्जन्यवृष्टीचा कल कसा आहे याचा आढावा घ्यावा. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह सुस्थितीत आहेत काय तसेच डोंगरमाथ्यावर कोठे भेगा पडल्या आहेत याची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी. घाटातील रस्ते अतिवृष्टीदरम्यान दरडी कोसळण्याच्या शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद केले जातात. अशा वेळी या रस्त्यांवरुन प्रवास करण्याचा धोका पत्करू नये. मानवी जीवन अनमोल असून त्यासाठी एवढी काळजी घेणे तरी गरजेचे आहेच.
– जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

पावसाळा हा निसर्गाला हिरवा शालू नेसवणारा ऋतू आहे. मनुष्य, पशु, पक्षांना आनंदधारांमध्ये भिजवून टाकणाऱ्या जलधारा मनसोक्त बरसू लागल्या म्हणजे उन्हाळ्यातील काहिली दूर होऊन मनाला एक टवटवीतपणा येतो. हाच पाऊस अविरत बरसू लागला म्हणजे खळाळते झरे, डोंगरातून वाहणारे पाण्याचे पाट, धबधबे, भरभरुन वाहणारे ओढे, नाले, तुडूंब वाहणाऱ्या नद्या अशी पावसाची अनेक रूपे आपल्या दृष्टीस पडतात.

एका ठराविक प्रमाणातील पाऊस आपली पाण्याची गरज भागवण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण हाच पाऊस जेव्हा मुसळधारेचे स्वरुप घेतो तेव्हा होणारे शेतीचे नुकसान तसेच पश्चिम घाटासारख्या भागात डोंगरकडे आणि उताराखाली राहणाऱ्या मानवी वस्त्यांच्या काळजीचे कारण ठरतो. पश्चिम घाटातील डोंगरांच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकवस्तीसाठी पावसाळ्यात अतिवृष्टीचा धोका दरवर्षी उद्भवतो. लोकवस्तीच्या जवळ भूस्खलनाची ठिकाणे असणे ही बाब मानवी जीवितास तसेच मालमत्तेस मोठा धोका पोहाचवू शकते. अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, भूस्खलनाच्या शक्यता वाढतात.

भूस्खलनाची कारणे काय?
भूस्खलनाची तीन मुख्य कारणे आहेत, ज्यामध्ये तेथील जमिनीतील मातीचे गुणधर्म, खडक, जमिनीच्या थरांची संरचना ज्या प्रकारची असेल त्याप्रमाणे मोठा पाऊस, कमी अधिक क्षमतेच्या भूकंपामुळे कठीण खडकावरील मातीचा थर मोकळा होऊन भूस्खलन होऊ शकते. याशिवाय शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण, निवासी व अन्य कारणांसाठी डोंगर रांगावर वाढते अतिक्रमण, डोंगरातील खोदकाम, डोंगरावरील वृक्षतोड, निर्वनीकरण आदी स्वरुपातील मानवी हस्तक्षेप हा देखील महत्त्वाचा घटक भूस्खलनाला कारणीभूत आहे.

राज्यातील १५ टक्के भूभाग दरडप्रवण असून त्यामध्ये पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ९ जिल्ह्यांचा समावेश होतो. कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या संधी, भेगा व फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत ठरतात. विशेषत: अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये, खडकातील संधी – भेगा – फटीमध्ये पाणी शिरून खडकाची झीज होत राहते, वजन वाढते आणि खडकांचे तुकडे अलग होवू लागतात. अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जावून म्हणजेच दरड कोसळून खालील बाजूस स्थिरावतात.

अतिपर्जन्यमानाच्या कालावधीत उतारी प्रदेशावरून वाहून जाणारे पाणी सपाटीकरण केलेल्या भागात स्थिरावते आणि मुरण्याच्या प्रक्रियेस सुरूवात होते. यामुळे जांभा खडकांमध्ये विघटन प्रक्रिया गतिमान होते आणि चिबड भूसभूशीत प्रस्तर ढासळतात. माळीण दुर्घटना ही पुणे जिल्ह्याच्या इतिहासातील भूस्खलनाची सर्वात मोठी दुर्घटना होय.

दरड कोसळण्याची संभाव्य ठिकाणे आणि उपाययोजना
पश्चिम घाटातील डोंगराळ भाग त्यामुळे डोंगराळ भागाखालील लोकवस्तीला विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यात घाटरस्ते, पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग, जुना मुंबई- पुणे महामार्ग अशा मोठ्या रस्त्यांसह वरंध घाट, ताम्हिणी घाट, दिवे घाट आदी घाटरस्ते, पश्चिम घाटातील छोटे मार्ग दरडप्रवण ठरतात.

याशिवाय जिल्ह्यात २३ गावे संभाव्य दरड कोसळणारी म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. आंबेगाव तालुक्यातील ५ गावे, भोर तालुक्यातील ४, मावळ तालुक्यातील ८ गावे, खेड व वेल्हे तालुक्यातील प्रत्येकी २, मुळशी व जुन्नर तालुक्यातील प्रत्येकी १ गावाचा यामध्ये समावेश आहे.

मावळ तालुक्यातील ५ गावांमध्ये संरक्षणात्मक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. भोर तालुक्यातील एका गावचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे तर वेल्हा व मावळ तालुक्यातील प्रत्येकी एका गावामध्ये संरक्षणात्मक कामे करण्याची गरज नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने अहवाल दिला आहे. तर सर्व तालुक्यात मिळून यापैकी १५ गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसनाची मागणी आहे. त्यानुसार प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

कसा देता येईल लोकसहभाग?
मोठा डोंगर आणि मुसळधार पाऊस या मानवी नियंत्रणातील बाबी नाहीत. पण हवामान खाते किंवा प्रशासन धोक्याची सूचना देईपर्यंत वाट न पाहता तेथील ग्रामस्थांनी सलग तास-दोन तास मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होणे गरजेचे आहे. त्यानंतर तेथील डोंगर, उतारावरील मातीच्या पाहणीनंतर तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार पुन्हा घरी परतण्याचा विचार करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.