पुष्पा परशुराम फाऊंडेशनच्या लोगोचे श्री क्षेत्र जेजुरी येथे अनावरण
.उरण (विठ्ठल ममताबादे ) : समस्त आगरी कोळी कराडी समाजाचे कुलदैवत व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र जेजुरी येथे श्रीखंडेरायाच्या साक्षीने आणि भगत कुटुंब यांच्या उपस्थितीत उरण तालुक्यातील भेंडखळ येथील पुष्पा परशुराम फाउंडेशन (प्रतिष्ठान)या सामाजिक संघटनेच्या लोगोचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत दिनांक 5/4/2022 रोजी सामाजिक कार्यकर्ते अतुल भगत यांनी पुष्पा परशुराम प्रतिष्ठानची स्थापना केली आहे .महाराष्ट्र शासन नोंदणी क्रमांक 1476 असलेल्या या सामाजिक संघटनेच्या लोगोचे श्री क्षेत्र जेजुरी येथे अनावरण करण्यात आले. उरण तालुक्यातील भेंडखळचे माजी सरपंच तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते अतुल भगत यांनी हि संघटना स्थापन केली.समाजातील गोर गरिबांना न्याय मिळावा, शासनाच्या सेवा सुविधा शेवटच्या घटका पर्यंत तळागाळात पोहोचविणे, गरजूंना अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात देणे, समाजाच्या सुख दुःखात सहभागी होणे हे पुष्पा परशुराम प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेचे हेतू, उद्दिष्ट असून भविष्यात हि संस्था फक्त उरण पनवेल नव्हे तर नवी मुंबई सह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील स्थानिक भूमीपुत्र, नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे पुष्पा परशुराम प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अतुल भगत यांनी यावेळी सांगितले.