कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची यशस्वी मध्यस्थी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : कामगार नेते तथा रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना न्याय देण्याचे काम सातत्याने केले जाते. या वर्षातील सहावा पगारवाढीचा करार मे. टाईम माऊझर इंडस्ट्रीज पेण या कंपनीतील कामगारांसाठी करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना ९,२५०/- रुपये चार वर्षासाठी पगारवाढ, देण्याचे मान्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर कामगारांसाठी कंझ्युमर इंडेक्सनुसार वाढीव महागाई भत्ता सुरु करण्यात आला आहे ज्यामुळे कामगारांना पगारवाढी व्यतिरिक्त आर्थिक फायदा होणार आहे. तसेच एक लाख रुपयांची मेडीक्लेम पॉलिसी, ८.३३% बोनस अधिक ३,०००/- रुपये अनुदान, तात्काळ कर्ज ३०,०००/- रुपये, क्रिकेट सामन्यांसाठी दरवर्षी १०,०००/- रुपये, रजेमध्ये वाढ, पिकनिकसाठी प्रत्येकी १,०००/- रुपये, पावसाळी छत्री देण्याचे मान्य करण्यात आले आहे.


या करारनाम्याप्रसंगी न्यू मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष पि. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील, व्यवस्थापनातर्फे जनरल मॅनेजर चंद्रकांत भोपी, एच. आर. मॅनेजर चेतन पिंगळे, कामगार प्रतिनिधी राजू पाटील, दिनेश पवार, किरण पाटील, प्रल्हाद ठाकूर, नरेश आंबेकर, वैभव शेळके तसेच संघटक शमीम अन्सारी, सुभाष यादव उपस्थित होते. संघटनेतर्फे केलेल्या भरघोस पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. टाईम माऊझर मधील कामगार प्रतिनिधींनी संघटनेचे आभार मानले.