महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे आवाहन
उरण दि 27(विठ्ठल ममताबादे ) : गणेशोत्सव जवळ आला आहे. हल्लीचा जमाना सेलिब्रिटीचा आहे. अनेक मान्यवरांना, सेलिब्रिटीना गणेशोत्सव काळात आरतीचा मान दिला जातो.मात्र समाजासाठी, देशासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सार्वजनिक गणेशोत्सव तर सोडाच स्वतःच्या घरातील गणपतीची साधी आरती सुद्धा करता येत नाही. घरात गणपती बसला तरी कर्तव्य म्हणून कामासाठी घराबाहेर राहावे लागते. आपल्या कुटुंबाना सुद्धा त्यांना वेळ देता येत नाही तसेच विविध सण उत्सव सुद्धा साजरे करता येत नाहीत. पोलीस अधिकारी कर्मचारी बांधव सुद्धा माणसे आहेत. त्यांनाही सुख दुःख आहे.त्यामुळे त्यांच्या भावनेचा आदर करत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले यांनी समस्त गणेश मंडळांना एक आवाहन व विनंती केली आहे की यावर्षीची गणेश उत्सवाची आरती ही आपल्या रक्षणकर्त्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते करावी.
गणेश मंडळ उत्सवाची आरती 11 दिवस दोन वेळा म्हणजे 22 वेळा होते. त्यातील एका आरतीचा मान हा आपल्या मंडळाच्या समोर रात्रंदिवस पहारा देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दया. यामधील उद्देश समजून घ्या की त्यांना हा गणशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या घरातील आरतीला हजर राहता येत नाही. निदान आपण सर्व गणेश मंडळांनी त्यांना आरतीचा मान देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याला या उत्सवात सहभागी करून घेतल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होईल व त्यांचा अशा प्रकारे गणेश मंडळाने सन्मान केल्या सारखे होईल असे आवाहन पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल अर्जुन दुबाले यांनी केले असून राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बॉईज संघटनेचे उरण तालुकाध्यक्ष वैभव पवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे उरण तालुक्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव काळात आरतीचा मान देण्याची विनंती केली आहे.