Ultimate magazine theme for WordPress.

प्रगतीशील शेतकरी दिलीप ढोल्ये यांचे निधन

0 41

संगमेश्वर दि . ६ ( प्रतिनिधी ): संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे येथील प्रगतीशील शेतकरी आणि दूध व्यावसायिक दिलीप गोविंद ढोल्ये ( ६९ ) यांचे आज रत्नागिरी येथे उपचारा दरम्यान निधन झाले .

दिलीप ढोल्ये हे शेतीमध्ये विविध प्रयोग करीत असत . विविध प्रकारची पिके घेऊन त्यांनी शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरली होती. त्यांच्या शेती आणि विविध लागवडी मधील प्रयोग पहाण्यासाठी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी, बागायतदार असुर्डे येथे येत असत . विशेष म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाचे उत्तम आगतस्वागत करुन दिलीप ढोल्ये हे शेती प्रयोगाबद्दलची माहिती कोणताही आडपडदा न ठेवता देत असत. असुर्डे परिसरात त्यांची ओळख भाई अशी होती. लहानांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांजवळ त्यांचे उत्तम स्नेहसंबंध होते .

संगमेश्वर परिसरातील एक यशस्वी दुग्ध व्यावसायिक अशी त्यांची गेली अनेक वर्षे ओळख राहिली. दररोज सकाळी रतिबाचे दूध वेळेत पोहचवणे हे त्यांच्या व्यवसायाचे खास वैशिष्ट्य असल्याने दुधाच्या माध्यमातून घराघरात त्यांचे कौटुंबिक नाते जोडले गेले . दूध व्यवसायाबरोबच गेली अनेक वर्षे त्यांनी दर्जेदार म्हैशी खरेदी विक्रीचा देखील यशस्वी व्यवसाय केला. त्यांच्याकडे येणारी एकही व्यक्ती त्यांनी कधीही चहा घेतल्याशिवाय परत पाठवली नाही याबरोबरच घरात असणारा भाजीपाला, चिकू, खरवस, केळी यापैकी वेळेला जे उपलब्ध असेल ते आलेल्या माणसाच्या हातात दिल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे. अत्यंत हौशी, हसतमुख, सदैव आनंदी आणि स्वतःचे दु:ख विसरुन दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची खास ओळख होती .

गेली काही वर्षे दिलीपभाई हे मधुमेहाने त्रस्त होते . त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार करण्यात आले मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अखेरीस त्यांना दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांनाच आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली . त्यांच्यावर असुर्डे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि असंख्य नागरिक उपस्थित होते . दिलीप ढोल्ये यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा , सून , नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.