नवीन दौरा कार्यक्रम झाला तरी स्थानिक पातळीवर निदर्शनांची तयारी
रत्नागिरी : प्रखर विरोधामुळे अवघ्या देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थळाला भेट देण्यासाठी गुरुवारी 26 मे रोजी फ्रान्समधील तज्ञांचे एक पथक येणार होते. मात्र, बुधवारी सायकांळी हा दौरा अचानक रद्द झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
आहे. या पथकाचा लवकरच सुधारित दौरा जाहीर होईल, असे बोलले जात आहे.

राजापूर तालुक्यात जैतापूर येथे फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्यातून सुमारे 1650 मेगावॅट क्षमतेची एक अणुभट्टी अशा सहा अणुभट्ट्या जैतापुर परिसरात उभारल्या जाणार आहेत. त्यातूनच दहा हजार मेगावॅटच्या आसपास अणुपासून ऊर्जानिर्मिती केली जाणार आहे. सुरुवातीपासूनच हा प्रकल्प वादाच्या भोवर्यात सापडला आहे. या पूर्वी स्थानिक प्रशासन विरुध्द प्रकल्पग्रस्त यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. अनेक आंदोलने झाली त्यातील एका आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने त्यातूनच पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात गोळी लागून तबरेज सायेकर नामक आंदोलक मृत्यूमुखी देखील पडला होता.
पथकाचा दौरा झाला तरी प्रकल्पग्रस्तांकडून विरोधी निदर्शने होण्याबाबत हालचाली सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, या पूर्वी जेवढ्या ताकदीने जैतापूर विरोधात निदर्शने व्हायची तेवढी ताकद आता निदर्शनात राहिलेली नसल्याचे चित्र आहे. 26 मे रोजी जैतापूर प्रकल्पस्थळाची पाहाणी करण्यासाठी येणार्या फ्रान्सच्या या पथकाचा हा दौराच रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. या पथकाच्या पुढील दौर्याच्या नियोजनाबाबत अद्याप प्रशासनाला माहिती नसल्याचे सांगण्यात आले.