भाजपा नेत्यांवर टीका करण्यापेक्षा मराठा समाजाच्या भल्यासाठी काम करा
भाजपा प्रदेश पॅनेलिस्ट किशोर शितोळे यांचा टोला
मुंबई, 27 ऑगस्ट 2022 : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या टीकेचा भाजपा प्रदेश पॅनेलिस्ट किशोर शितोळे यांनी समाचार घेतला. भाजपा नेत्यांवर टीका करण्यापेक्षा मराठा समाजाच्या भल्यासाठी काम करा, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
ते म्हणाले की, संभाजी ब्रिगेडची स्थापना मराठा समाजासाठी काम करण्यासाठी झाली. मराठा समाजाच्या विविध मागण्या ब्रिगेडने मांडल्या. पण अचानक आता ब्रिगेड मराठा समाजाचे नुकसान करणाऱ्यांसोबत जात आहे, हे आश्चर्यकारक आणि दुःखदायक आहे. मराठा समाजाचे नुकसान करणाऱ्यांना साथ देऊ नका. मराठा समाजाच्या विकासाचा मुद्दा सोडू नका.
त्यांनी सांगितले की, ज्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण घालविले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची प्रगती थांबवली, सारथी संकटात ढकलून मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान केले अशा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडने जाण्याचे आश्चर्य वाटत आहे. त्याच वेळी मराठा आरक्षण देणाऱ्या, सारथी संस्था स्थापन करणाऱ्या, आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृह देणाऱ्या भाजपालाच पुन्हा नावे ठेवताय, हे धक्कादायक आहे. फडणवीस सरकारने ही कामे केली त्यावेळी आपण सर्व बैठकांना सोबत होतो, साक्षीदार होतो आणि आज हा असा संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेत अचानक बदल कसा झाला, असा प्रश्न पडतो.