महत्वाकांक्षी मिऱ्या–निवळी ग्रामीण पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण करा : उदय सामंत
रत्नागिरी : जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित 135 कोटींहून अधिक खर्चाच्या महत्वाकांक्षी मिऱ्या-शिरगाव-
निवळीतिठा पाणीपुरवठा योजनेसाठी नागरिक स्वत: जमीन देणार नसतील तर प्रसंगी भूसंपादन करा व 24 महिन्यात
सदर योजनेचे काम पूर्ण करा असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात या बाबत एका बैठकीत त्यांनी आढावा घेतला. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता बी.के.वानखडे यांची प्रमुख
उपस्थिती होती. 34 गावांमधील 13 ग्रामपंचायती या योजनेत समाविष्ट आहे. या गावांचे सरपंच तसेच ग्रामसेवक
देखील या बैठकील उपस्थित होते.
प्रती व्यक्ती 55 लिटर पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पुढील 30 वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन
ही योजना आखण्यात आली आहे.37 गावे आणि 204 वाडयांना यामुळे नळाद्वारे पाणीपुरवठा होईल.
सदर योजना 135 कोटी 72 लाख 78 हजार रुपयांची आहे. याला 25 मे 2022 रोजी तांत्रिक मान्यता लाभली
असून यासाठी 112 कोटी 58 लक्ष 69 हजार 105 रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. या योजनेसाठी 2 कोल्हापूरी
पध्दतीचे बंधारे, जॅकवेल तसेच जलशुध्दीकरण यंत्रणा उभारावयाची आहे. गुरुत्वावाहिनीच्या अधारे पाणी पुरविण्यात
येणार असून यासाठ योजना क्षेत्रात 45 उंच व बैठया साठवण टाक्या लागणार आहेत.
या योजनेत जाकिमिऱ्या, सडामिऱ्या, शिरगाव, निवळी, करबुडे, हातखंबा, पानवल, खेडशी, पोमेंडी (बु),
कुवारबांव, मिरजोळे, नाचणे आणि कर्ला या 13 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या गावांना होणार पाणीपुरवठा
जाकीमिऱ्या, मिऱ्या, सडामिऱ्या, आडी, मुसलमानवाडी, शिरगाव, तिवंडेवाडी, झाडगाव, निवळी,
रावनांकवाडी, धनावडेवाडी, काजरेकोंड, कपिलनगर, करबुडेकोंड, करबुडे, कुंभारवाडा, मुळगाव, वेद्रेवाडी, डांगेवाडी,
हातखंबा, तारवेवाडी, घवाळवाडी, पानवल, खेडशी, पोमेंडी, कारंवाचीवाडी, कुवारबाव, मधलीवाडी, मिरजोळे,
पाडावेवाडी, शीळ, ठिकाणे दाते, आंबेशेत, नाचणे, जुवे, कर्ला, मुस्लीमवाडी.
योजनेसाठी वेळवंड येथे 60 गुंठे जलशुध्दीकरण केंद्र उभारणीसाठी जागा लागणार आहे. तसेच विविध ठिकाणी
टाक्यांची उभारणी करण्यासाठी वेळवंडसह एकूण 100 गुंठे जागा लागणार आहे. योजनेत समाविष्ठ सर्व ग्रामपंचायतींनी
जागा देण्याची आज तयारी दर्शविली असल्याने उर्वरित काम वेळेत करण्यासाठी यंत्रणेने काम सुरु करावे असे निर्देश
उदय सामंत यांनी या बैठकीत दिले.
भाटये पाणीपुरवठा
भाटये येथील पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे गावाला अद्यापही पाणी पुरवठा सुरु
झालेला नाही. यासाठी आता समांतर वाहिनी टाकावी लागणार आहे. त्याची कार्यवाही 15 दिवसात सुरु करण्याचे
निर्देशही सामंत यांनी भाटये ग्रामस्थांच्या एका बैठकीत केले.