https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

माखजन पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लिम एकता पाहून भारावलो

0 62

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांचे गौरवोद्गार
कोंडीवरे येथील मदरशात हिंदू-मुस्लिम कार्यकर्त्यांची बैठक

आरवली : माखजन पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लिम एकता पाहून मी भारावून गेलो असून ही एकता सर्वांसाठी आदर्श निर्माण करणारी आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मार्गदर्शन करताना केले. कोंडीवरे ता. संगमेश्वर येथे मदरसामध्ये आयोजित हिंदू-मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी डॉ. मोहितकुमार गर्ग बोलत होते.
या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष दिलीप जोशी, आरवलीचे सरपंच निलेश भुवड, माजी सरपंच कृष्णा भुवड, मुस्लिम जमातीचे अध्यक्ष सलीम कापडी, सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दारूल उलूम इमाम अहमद रजा या मदरसाचे प्राचार्य मौलाना अ. रहीम काझी यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, आरएसएसचे दिलीप जोशी आदी मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना दिलीप जोशी यांनी माखजन परिसरात हिंदु मुस्लिम तसेच सर्व जाती समाजातील लोक सलोख्याने राहत असून एकमेकांच्या धर्माचे आदर करणारे आहेत. यावेळी माखजन विभागात तसेच तालुक्यात सामाजिक सलोखा असल्याने कोणताच अनुचित प्रकार घडणार नाही असे दिलीप जोशी यांनी सांगितले. डीवायएसपी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग म्हणाले की, देशाच्या हितासाठी हिंदू मुस्लिम ऐक्य गरजेचे आहे. आदर्श पिढी घडवण्यासाठी आतापासूनच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले पाहिजेत. सध्या सोशल मीडियाचा युग आहे, तेव्हा या मीडियाचा वापर करताना फार काळजी घेणे गरजेचे आहे. एखादा चुकीचा छोटा संदेश फार मोठी अराजकता माजवू शकतो यासाठी सोशल मीडियावर येणारे मेसेज यांची खातरजमा करणे आवश्यक आहे. यासाठीच रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी ऐहसास हे अभियान सुरू करण्यात आले असून या अभियानाला विद्यार्थी पालकांनी तसेच संस्था चालकांनी सात द्या, असे आवाहन करताना माखजन भागातील हिंदु मुस्लिम ऐक्याची प्रशंसा करताना आपण भारावून गेलो असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला कमरुद्दीन सावंत, भाई खतीब, अब्दुला माद्रे, अखतर खतीब, सुलेमान खान, अयुब मुल्ला, साकीब खतीब, हिदायत कापडी, विजय खांडेकर, संदीप निकम, निलेश केळकर, लियाकत कापडी, सिद्दीक कापडी, सैफ शेकासन, दत्ताराम लांबे, मौलाना बशीर, अनवर खान, मोज्जम शेकासन, मुदसर मोडक, राहील कापडी, इरफान भोंबल आदी उपस्थित होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पत्रकार जाकीर शेकासन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कोंडीवरे मदरसा येथे हिंदू मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग.
आरएसएसचे दिलीप जोशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना मौलाना अ. रहीम काझी.
Leave A Reply

Your email address will not be published.