मागण्या मान्य न झाल्यास मर्क्स कंपनीचे गेट बंद करणार : प्रशांत पाटील
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पागोटे गावाला खूप मोठा इतिहास आहे. खूप मोठा संघर्षही आहे.पागोटे गावातील स्थानिक भूमिपुत्रांनी शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमीनी येथील सीएफएस, कंपनी वाल्यांना दिले. त्याबद्दलात नोकरी व इतर हक्क वा अधिकार देण्याचे कंपनी प्रशासनाने मान्य केले.परंतु आता या स्थानिक भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे एपीएम टर्मिनल्स कंपनीने(ओल्ड मर्क्स कंपनीने )जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने स्थानिक भूमीपुत्र, शेतकऱ्यांवर खुप मोठा अन्याय झाला आहे.या अन्यायाचा मी जाहीर निषेध करतो. येत्या दोन दिवसात कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सरळ मर्क्स कंपनीचे गेट बंद करण्यात येईल असा थेट आक्रमक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणातून दिला.
स्थानिक प्रकल्पग्रस्त कामगारांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व बदली कामगार घेणे, कामगारांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे आदी विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे बुधवार दिनांक 8 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उरण तालुक्यातील पागोटे येथील ओल्ड मर्क्स कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी या धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी जाहीर पाठिंबा देत आपली भूमिका स्पष्ट केली.यावेळी प्रशांत पाटील यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. कोणत्याही कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही.प्रत्येक कामगारांना न्याय मिळवून देणारच असा शब्द प्रशांत पाटील यांनी उपस्थित कामगारांना दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट भार्गव पाटील यांनी कंपनी प्रशासनाकडून कामगारावर कसा अन्याय चालू आहे याचा पाढाच वाचला.मात्र कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणीही मागे हटणार नाही असे कंपनीला ऍडव्होकेट भार्गव पाटील यांनी ठणकावून सांगितले.
या धरणे आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उरण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, रायगड जिल्हा युवक उपाध्यक्ष समाधान म्हात्रे,तालुका अध्यक्ष मनोज भगत, महिला तालुकाध्यक्ष हेमांगीताई पाटील, उरण तालुका युवक अध्यक्ष कैलास भोईर, शहर अध्यक्ष गणेश नलावडे, महिला शहर अध्यक्ष संध्याताई घरत, म्हालन विभाग अध्यक्ष सुनिल तांडेल, पागोटे अध्यक्ष दिनेश पाटील,नागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच परीक्षित ठाकूर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.