मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात उंचीच्या पुलाला कै. ल. र. हातणकर यांचे नाव द्यावे
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा राजापूरची आ. राजन साळवींकडे मागणी
राजापूर : अर्जुना नदीवर बांधण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वाधिक उंचीच्या पुलाला नि:स्वार्थी, निष्कलंक आणि राजकारणातील आदर्शवत व्यक्तीमत्व असलेले राजापूरचे पहिले राज्यमंत्री कै. ल. र. तथाभाई हातणकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा राजापूरच्यावतीने आ. राजन साळवी यांच्याकडे करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन संघाच्या पदाधिकार्यांसह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दीपक नागले आणि कुणबी समाजबांधवांनी आमदार राजन साळवी यांना दिले.
या वेळी श्री. नागले यांच्यासह संघ प्रतिनिधी मंडळ सदस्य प्रभाकर वारीक, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, कुणबी संघ राजापूर शाखा कार्यकारीणी सदस्य मनोहर गोरीवले यांच्यासह अन्य कुणबी समाजबांधव उपस्थित होते.
राजापूर मतदारसंघाचे पाचवेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करणारे कै. भाई हातणकर यांनी त्याकाळामध्ये विकासकामंसाठी अल्प निधी मिळत असतानाही मतदारसंघाच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावली. दूर-दूरवर विखुरलेल्या गावांच्या दुर्गम पायवाटा संपुष्टात आणून गावांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडण्याच्या कामाचा पाया रचण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. राजापूर तालुक्याला कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना रस्त्यांच्या सहाय्याने जोडण्यासह कॉजवे आणि नदी-नाल्यांवरील छोटे-मोठे पूल बांधून पावसाळ्यातील प्रवाशांसह लोकांच्या संपर्काचा प्रश्न निकाली काढला. कुणबी समाजाचे नेतत्व करताना समाजबांधवांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
त्यांच्या आदर्शवत व्यक्तीमत्वासह कार्याच्या स्मृती कायमस्वरूपी राहण्यासाठी अर्जुना नदीवरील सर्वाधिक उंचीच्या पूलाला त्यांचे नाव द्यावे अशी कुणबी संघाच्यावतीने मागणी करण्यात आली आहे.
राजापूरचे पहिले आमदार
कै. ल. र. हातणकर हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रीपद भूषविणारे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार आहेत. शरद पवार, सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी कारभार पाहीला होता. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यासह महसूल खाते, पुनर्वसन खाते, सहकार खाते, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास खाते आदी खात्यांचा राज्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार सांभाळला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते तर पाचल हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यान्नी काम केले होते.