मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी पुलावर ट्रक-कारचा भीषण अपघात : आई मुलासह ट्रक चालक ठार
लांजा : मुंबई गोवा महामार्गांवर पाली आणि लांजा दरम्यान अंजणारी घाटात तेथील पुलावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यात अपघातग्रस्त दोन्ही वाहने पुलावरून नदीपात्रात कोसळली. रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास हा अपघात घडला.
या भीषण अपघातातमध्ये ट्रक चालकासह कारमधील दोघेजण अशा एकूण तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत ट्रक चालक हा लांजा तालुक्यातील पुनस येथील असून कारमधील चिपळूण येथील रहिवासी आहेत.
या भीषण अपघातातमध्ये ट्रक चालक विजय सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. याबरोबरच एर्टिगा कार चालक समीर प्रदीप शिंदे आणि त्यांची आई सुहासिनी प्रदीप शिंदे (६१ )यांचा जागीच मृत्यू झाला तर समीर शिंदे यांच्या पत्नी समृद्धी शिंदे (वय २९) आणि वडील प्रदीप हिंमतराव शिंदे (वय ६५) हे दोघे जण गंभीर जखमी झाले.
अपघातात दोन्ही वाहने पुलावरून कोसळल्यामुळे त्यांचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मदतकर्त्यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.