रत्नागिरी : रत्नागिरी येथे प्रस्तावित विमानतळ भूसंपादन संबंधित दर निश्चित करण्यात येत आहे. शासनाने यासाठी 71 कोटी रुपये दिले आहेत. या संदर्भातील जमिनधारकांचे सर्व गैरसमज दूर झाले असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
वाढीव भ संपादनासाठी ज्यांची जमिन यासाठी लागणार आहे त्यांच्याशी चर्चा यशस्वी ठरल्याचे ते म्हणाले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व संबंधितांशी त्यांनी एका बैठकीत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोस्ट गार्डचा येथे असणारा विमानतळाचा भाग विस्तारीत स्वरुपात विमानतळ बांधणीसाठी वापरला जाणार आहे. याठिकाणी भूसंपादनासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भूसंपादन 71 कोटी व विमानतळ इमारत 31 कोटी रुपये असा निधी उपलब्ध करुन दिला आहे. लवकरच विमानतळ उभारणीच्या कामाला गती येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
या बैठकीला कोस्ट गार्ड तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
साखरतर म्हामूरवाडी पाणीपुरवठा
याचवेळी साखरतर आणि म्हामूरवाडी पाणी पुरवठ्याबाबत दोन्ही गावच्या ग्रामस्थांसोबत त्यांनी चर्चा केली. वादाचे विषय मिटवून लवकरच म्हामूरवाडीसाठी स्वतंत्र योजना देण्याबाबत या बैठकीत तोडगा निघाला आहे.
