रस्त्याकडेला बंद असलेला ट्रक आगीत जळून खाक
दापोली : दापोलीहून तालुक्यातील पाजपंढरीकडे जाणार्या मार्गावर अनेक दिवस बंद असलेल्या मासळी वाहतुकीच्या ट्रकला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसला तरी ट्रक आगीत जळून खाक झाला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही.
हर्णै-पाजपंढरी मार्गावर गेले कित्येक दिवस श्रीवर्धन (रायगड) तालक्यातील एक मासळी वाहतुकीचा ट्रक उभा होता. दि. 5 रोजी दुपारी दीडच्या सुमारास या ट्रकला आग लागली. तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर ते घटनास्थळी हजर झाले. या आगीचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळानजीक सुक्या गवताला अगोदरच वणवा लागला होता. या वणव्यामुळे आग लागली असावी, असा पोलिसांनी प्रथमदर्शनी निष्कर्ष काढला आहे. दापोली नगर पंचयतीचा पाण्याचा बंब बोलावून ट्रकची आग नियंत्रणात आणण्यात आली. तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. तसेच सुदैवाने या गाडीच्या डिझेल टँकमध्ये डिझेलच नव्हते नाहीतर नाहीतर अनर्थ घडला असता. या बाबत अधिक तपास हर्णै पोलीस करत आहे.