नवी दिल्ली २५ : श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी श्रीमती मुर्मू यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या समारंभास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री व विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास उपस्थित होते. या पदावर विराजमान होणाऱ्या श्रीमती द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2022/07/murmu-1.jpg)
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2022/07/murmu2-2.jpg)
श्रीमती मुर्मू या राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या श्रीमती मुर्मू या पदाची शान आणखी वृद्धिंगत करतील. त्यांच्यामुळे भारताचा गौरव जागतिक स्तरावर आणखी उंचावेल, असा सार्थ विश्वास आहे. त्यांच्या कारकिर्दीला आदरपूर्वक शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.