Ultimate magazine theme for WordPress.

लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाची स्वच्छता

0 46

पुरातत्व विभाग आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम


रत्नागिरी : ‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ‘, अशी सिंहगर्जना करणारे महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथील जन्मस्थान स्मारकाची पुरातत्व विभाग आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच स्वच्छता करण्यात आली.

जन्मस्थान स्मारकाचा परिसर आणि लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा स्वच्छ करण्यात आला. यामध्ये पुरातत्व विभागाचे श्री. रवींद्र सावंत, पेठ किल्ला येथील सर्वश्री तन्मय जाधव , आदित्य कौजलगीकर, साईराज बिर्जे, कु. कार्तिक टापरे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री महेश लाड, वसंत दळवी आणि अन्य कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते.


लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्‍म २३ जुलै १८५६ या दिवशी रत्नागिरीतील टिळक आळीतील सदोबा गोरे यांच्या घरात झाला. आज हे जन्मस्थान स्मारक भारतीयांच्या आस्थेचे केंद्र बनले आहे. हे जनमस्थान स्मारक महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी स्मारक स्वच्छता करण्यामागील उद्देश सांगून लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. क्रांतीकारक आणि राष्ट्रप्रेमी यांनी राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाचे महत्त्व तरुण पिढीला समजावे, यासाठी १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘क्रांतीकारकांची शौर्यगाथा असलेले ‘ क्रांतीगाथा ‘ हे प्रदर्शन जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उपस्थितांनी भविष्यातही असे उपक्रम करायला आम्ही सदैव सहकार्य करु, असे सांगितले.
सर्वांसाठी श्री. गिरीश जोशी यांनी चहाची व्यवस्था केली .

Leave A Reply

Your email address will not be published.