उरण दि 11(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील वशेणी गावचे सुपुत्र, एक आदर्श गुरूजी, कलाप्रेमी व्यक्तीमत्व, विविध पुरस्काराने सन्मानित झालेले, कीर्तनकार, प्रवचनकार,कवी गीतकार, दांडपट्टाधारी अशा विविध उपाध्यांनी वशेणी गावातील एक नावाजलेले व्यक्तीमत्व म्हणजे चंद्रहास चांगदेव गावंड गुरूजी. चंद्रहास गावंड गुरूजी यांचे सोमवार दि 4/7/2022 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी, त्यांच्या जीवनप्रवासातील आठवणींना उजाळा मिळावा, वशेणी गावा सोबत समाजाला त्यांनी जे शैक्षणिक, कलात्मक, अध्यात्मिक योगदान दिले आहे या योगदानाची थोडीफार उतराई म्हणून अॅड गुलाबराव गावंड यांचे अध्यक्षते खाली शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.


या वेळी रायगड भूषण प्रा.एल बी पाटील, इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप रायगड चे अध्यक्ष रमेश थवई, सामाजिक कार्यकर्ते निलेश भरत म्हात्रे, अॅड हिरामण पाटील, वशेणी गावचे सरपंच जीवन गावंड, माजी पंचायत समिती सदस्य लवेश म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ठाकूर, गणपत ठाकूर,पेण प्राथमिक पतपेढीचे संचालक रवि पाटील, नारायण पाटील गुरूजी, गजानन पाटील गुरूजी,डी.बी.पाटील, पोलीस पाटील दिपक म्हात्रे, आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वर्गीय चंद्रहास गावंड गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर वशेणी इतिहास संपादकीय मंडळ, एस एस.सी बॅच 1988, इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप रायगड, कोमसाप उरण, सरकारी कर्मचारी पतपेढी वशेणी,जे एस.डब्ल्यू कंपनी वर्कर्स स्टाॅप , ग्रामपंचायत वशेणी, गावंड परिवार आणि गुरुजींचा विद्यार्थी वर्ग यांच्या कडून सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या शोकसभेत बोलताना रायगड भूषण तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यकारिणी सदस्य प्रा.एल .बी. पाटील म्हणाले की चंद्रहास गावंड गुरूजी म्हणजे हे वशेणीच्या इतिहासातील सोनेरी पान होते. त्यांच्या अंगी असणारे कलागुण हे त्यांनी स्वतःपुरते न ठेवता समाजासाठी अर्पण केले.म्हणून त्यांच्या कार्याचा स्मृतीगंध केवळ वशेणीच्या माती पुरता मर्यादित न राहता साता समुद्रा पार गेला आहे.
या वेळेस निलेश म्हात्रे, किशोर म्हात्रे,बी.जे म्हात्रे, राघव पाटील, सरपंच जीवन गावंड,मनोज गावंड, लवेश म्हात्रे आदी मान्यवरांनी चंद्रहास गुरूजीं बद्दल आपल्या मनोगतातून आदरभाव व्यक्त केला.कार्यक्रमाचे आयोजन वशेणी णइतिहास संपादकीय मंडळ, एस एस सी बॅच 1988 , गावंड परिवार आणि संदेश गावंड मित्र परिवार यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.