विठ्ठला, राज्यातील शेतकरी सुखी समाधानी होऊ दे : नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी
मुंबई, दि. ५ जुलै
राज्यातील शेतकऱ्यांवरील आस्मानी सुल्तानी संकटातून सुटका कर आणि त्याच्या आयुष्यात सुखा- समाधानाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना पंढरपूरच्या विठ्ठलाकडे केली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिंडीत सहभागी होत संत शिरोमणी श्री. तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर येथील अकलूज येथे मनोभावे दर्शन घेत विठुरायाच्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. अकलूज येथे झालेल्या रिंगण सोहळ्यातही ते उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशावर व राज्यावर आलेले संकट गंभीर असून या संकटातून जनतेची सुटका झाली पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले, त्याग केला ते स्वांतत्र्य, लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आज धोक्यात आहे. देशावर आलेले हे मोठे संकट आहे या संकटातून देश वाचला पाहिजे. देश वाचला तर आपण वाचू..त्यासाठी पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घातलं आहे.
मागील दोन- तीन वर्षात शेतकऱ्यांना अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपिटीचा संकटाचा सामना करावा लागला. शेतातील उभं पीक हातातून गेलं. शेतकऱ्याच्या तोंडातला घास हिरावून घेतला गेला. मविआचे सरकारने त्या संकटात तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांना भक्कम आधार दिला. राज्यातील नवीन सरकारनेही तातडीने शेतकरी हिताचे निर्णय घेऊन त्यांच्यापाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. जून महिना संपला तरी राज्याच्या काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. आता पावसाला सुरुवात झाली आहे, यंदाचा खरिपाचा हंगाम चांगला जावा आणि शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे यावेत हीच विठुराया चरणी प्रार्थना केल्याचे नाना पटोले म्हणाले.