व्यापारी पैसा फंड संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील ९३ वर्षांचे योगदान मोलाचे : ॲड. ओवेस पेचकर
संगमेश्वर : मुलांना गुणगौरव समारंभातून प्रोत्साहन मिळते . सर्व विद्यार्थी आपापल्या परिने अभ्यासात प्रगती करत असतात . सर्वांना जरी यश सारखे मिळाले नाही , तरी यशासाठी प्रयत्न कायम ठेवायला हवेत . आपणही सर्वसामान्य विद्यार्थी होतो. मात्र, आपणही यशाच्या जोरावर आज गेली दहा वर्षे उच्च न्यायालयात वकिली करत आहोत . २३ देशात आजवर आपण प्रवास केला आहे . पैसा फंडचे गेले ९३ वर्षांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोलाचे असून अभिनंदनीय आहे . विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शिल्पकार संस्थाचालक , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असतात . असे गौरवोद्गार ॲड . ओवेस पेचकर यांनी काढले .
व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज प्रशालेत संपन्न झाला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲड . पेचकर हे बोलत होते . यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये , सचिव धनंजय शेट्ये , सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे , व्यापारी फैज पाटणकर , प्रतिज्ञा कांबळे , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे , प्रकाश दळवी , योगेश बांडांगळे आदि मान्यवर उपस्थित होते . यावेळी बोलतांना ॲड . ओवेस पेचकर पुढे म्हणाले की, पैसा फंड शिक्षण संस्था स्थापनेचा व्यापारी वर्गाचा हेतू विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवून साध्य करुन दाखवला आहे . शिक्षण संस्था चालवणे सध्या खूप कठीण आहे . याचा अनुभव आपण स्वतः एक शिक्षण संस्था चालवत असल्याने घेत आहोत . आपल्या वकिली प्रवासाची सविस्तर माहितीही पेचकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.
उच्च शिक्षणाचा निर्णय घेतांना प्रथम पालक , शिक्षक , संस्थाचालक यांच्याजवळ चर्चा करा आणि स्वतःलाही याबाबत प्रश्न विचारा तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल असा सल्ला त्यांनी यावेळी दिला . कोकण बोर्ड नेहमीच प्रथम क्रमांकावर आहे . मात्र उच्च शिक्षणातही युपीएससी , आयपीएस , एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये देखील कोकणातील विद्यार्थी आघाडीवर असायला हवेत अशी अपेक्षा पेचकर यांनी व्यक्त केली . सोशल मिडियाचा फार वापर करु नका असेही आवाहन पेचकर यांनी याप्रसंगी केले . कौतुकाने विद्यार्थ्यांनी कधीही भारावून जावू नये . व्यसनाधीनतेपासून कायम दूर रहायला पाहिजे, असे सांगून अखेरीस पेचकर यांनी सर्व विद्यार्थ्यांनी कोकणचे नांव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले .
प्रास्ताविकात मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी हा गुणगौरव सोहळा मार्च २० आणि २१ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा असल्याचे स्पष्ट करुन शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. अहवालवाचन पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी केले . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी म्हणून सन २० – २१ साक्षी प्रदीप दळी , वैभव भालचंद्र सप्रे , सन २१ – २२ तन्वी प्रवीण शिंदे , आदित्य अनिल जाधव यांना गौरवण्यात आले . प्रशालेत दहावी – बारावीत प्रथम , प्रशालेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले .
संस्था सचिव धनंजय शेट्ये आपल्या मनोगतात म्हणाले की, ओवेस पेचकर यांच्या सारखा सच्चा कोकणप्रेमी आणि उच्च न्यायालयातील प्रथीतयश विधीज्ञ आज पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित राहिले याचा व्यापारी पैसा फंड संस्थेला नक्कीच अभिमान आहे. पेचकर यांचे कोकणप्रेम पाहून आपण भारावून गेलो . पेचकर यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी उच्च न्यायालयाचे जे लक्ष वेधून घेतले त्यामुळे आज महामार्गाच्या कामाने गती घेतली आहे . ज्या व्यक्तिवर चांगले संस्कार होतात त्यांना यश नक्कीच मिळते . यासाठी शिक्षण महत्वाचे आहे . जीवनात सकारात्मक विचार असणे खूप महत्वाचे असल्याचे नमूद करुन शिक्षणासाठी कष्ट आणि अपार मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यापारी पैसा फंड संस्थेला अभिमान असल्याचे शेट्ये यांनी स्पष्ट केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी तर आभारप्रदर्शन दिलीप मोरगे यांनी केले.