https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

शासकीय योजनेसाठी मोफत जमीन देणाऱ्या जमीन मालकालाच उदघाटन कार्यक्रमात वगळले

0 60

सोमेश्वर गावातील घटना. ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी.

पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा उद्घाटन कार्यक्रम

रत्नागिरी : तालुक्यातील सोमेश्वर येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मडकेवाडी शेलारवाडी रोहिदासवाडी नळपाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन नुकतेच पार पडले. दरम्यान, या योजनेसाठी जमीन मोफत देणाऱ्या ग्रामस्थालाच या उद्घाटन कार्यक्रमात जाणीवपूर्वक वगळण्यात आले असल्याने लोकांमधून तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे. मूळ जमीन मालक दत्तात्रय सोहोनी यांनीही याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना आपली खंत व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत सोमेश्वर गावातील मडकेवाडी, शेलारवाडी, रोहिदासवाडी या तीन वाड्यांसाठी मंजूर झालेल्या नळपाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन नुकतेच पार पडले. या योजनेला आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या विहिरीसाठी सोमेश्वर गावातील दत्तात्रय सखाराम सोहोनी यांची स्वमालकीची जमीन आवश्यक होती. या जमिनीत पाण्याचा मुख्य स्त्रोत उपलब्ध असल्याने या जमिनीची या योजनेसाठी नितांत गरज होती. यानुसार संबंधितांनी दत्तात्रय सोहोनी यांना तुमची जमीन मुख्य पाण्याचा स्त्रोत म्हणून या योजनेकामी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. दत्तात्रय सोहोनी यांनी कोणतीही अडचण न सांगता मोफत जमीन देण्यास संमती दर्शवली. गावातील या वाड्यांमधील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण लक्षात घेऊन येथील पाण्याचे दुर्भिक्ष कायमचे मिटावे या दृष्टिकोनातून आपली जमीन या योजनेकामी त्यांनी मोफत दिली. त्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दप्तरी त्यांनी त्वरित करून दिली.
सोमेश्वर गावामधील सर्वे नंबर १३५ हिस्सा नंबर १ सजा ही जमीन विनामोबदला दत्तात्रय सखाराम सोहोनी व राजश्री मोरेश्वर साठे यांनी बक्षीस पत्राद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने करून दिली. असे असताना या योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्याप्रसंगी संयोजकांनी पाण्यासाठी जमीन देणाऱ्या मूळ जमीन मालकांनाच या सोहळ्याचे निमंत्रण देण्याचे औदार्य दाखवले नाही. या योजनेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जमीन मोफत देणाऱ्या दत्तात्रय सोहोनी यांना निमंत्रित केले नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे. शासकीय योजनेसाठी स्वतःची पाण्याची जागा मोफत देणाऱ्या जमीन मालकांनाच निमंत्रित करण्याचे संबंधित सोयीस्कररीत्या जाणिवपूर्वक विसरून गेले. हे कृतज्ञतेचे भान स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला राहिले नसल्याने हे दुर्दैवच म्हणावे लागेल अशा खेदजनक प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत.


नळपाणी पुरवठा योजनेच्यासाठी मी दिलेली मोफत जमीन ही कोणत्याही प्रलोभनापोटी, सत्कार, हारतुरे,शाल श्रीफळ यांच्या अपेक्षेने दिलेली नाही. संबंधित वाड्यांमधील ग्रामस्थ यांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेऊन, त्यांची पाण्यासाठी होणारी वणवण वाचावी हा शुद्ध हेतू ठेवून ही जमीन या योजनेसाठी मोफत दिलेली आहे. असे असताना योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलावणे तर सोडाच साधा उल्लेखदेखील संयोजकांनी केलेला नाही. अशा कृतीने एक वेगळा संदेश समाजामध्ये पसरला जाईल. यामुळे सामाजिक कार्यासाठी कोणी दाता उत्स्फूर्तपणे आपले योगदान देणार नाही, अशी खंत दत्तात्रय सखाराम सोहोनी यांनी याबाबत बोलताना व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.