श्री क्षेत्र नाणीजधामला बुधवारी गुरुपौर्णिमा सोहळा
आणखी दहा रुग्णवाहिका रुग्णसेवेत दाखल
नाणीज : श्री क्षेत्र नाणीजधाम येथे बुधवारी 13 जुलै रोजी गुरूपौर्णिमा वारी उत्सव सोहळा मोठ्या दिमाखात होत आहे. त्यादिवशी आणखी दहा रुग्णवाहिका समाजाच्या सेवेत दाखल होणार आहेत. दरम्यान गुरुपूजन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक सुंदरगडावर येणार आहेत.
सोहळ्याची सुरूवात दि. 12 जुलै रोजी होणार आहे. सकाळच्या धार्मिक विधीनंतर 10 ते 1 श्री सद्गुरू याग व अन्नदान विधी होईल. याचदरम्यान देवदेवतांना सोहळ्याचे निमंत्रण देणार्या मिरवणुका होतील. त्यांची जबाबदारी वलसाड (गुजरात) जिल्हा सेवा समितीकडे नाथांचे माहेरची जबाबदारी आहे. गोवा जिल्हा सेवा समितीकडे वरद चिंतामणीची जबाबदारी, उत्तर रायगडकडे प्रभू श्रीराम मंदिर व संतशिरोमणी गजानन महाराज मुख्य मंदिराची जबाबदारी नागपूर जिल्हा सेवा समितीकडे आहे.
बुधवार हा सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. दुपारी श्री सद्गुरू याग व अन्नदान विधी पूर्णाहुती आहे. 2 ते 5 या कालावधीत चरण दर्शन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आहे. महामार्गावर होणार्या अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याचे कार्य संस्थानच्या 27 रुग्णवाहिका गेले एक तप अव्याहतपणे करीत आहेत. त्यात आणखी 10 रुग्णवाहिका समाजसेवेत दाखल होत आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा गुरुपौर्णिमेला आहे. आता 37 रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या सेवेत असतील. त्याचबरोबर एक हजार भाविकांची सोय करणारे यात्री निवासही यावेळी भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्याचा वास्तूशांत समारंभ आहे.
रात्री दक्षिण पीठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर सर्वांचे आकर्षण असलेले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. या दोन्ही दिवस 24 तास महाप्रसाद, मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. सर्व कार्यक्रम नाशिकचे वे.शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरूजी विधिवत करणार आहेत.
सोहळ्याची सुंदरगडावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उद्यापासून भाविक येण्यास सुरूवात होईल. कोरोनामुळे येथे दोन वर्षे गुरूपौर्णिमा सोहळा झाला नाही. यंदा तो होत असल्याने मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जोरदार पाऊस सुरू आहे. त्याची तमा न बाळगता हा सोहळा होईल. भाविक सुंदरगडावर जागा मिळेल तिथे गटागटाने गुरूपूजन करतील. दोन दिवस संपूर्ण गड भाविकांनी फुलून जाणार आहे.