संघटन मजबुतीसाठी राज्यात काँग्रेस १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबवणार
कृती कार्यक्रम पक्षासाठी दिशादर्शक : बाळासाहेब थोरात
राजकीय विचारविनीमयासाठी व निवडणूक व्यवस्थापनासाठी समिती स्थापन करणारः अशोक चव्हाण
शिर्डी कार्यशाळेच्या कृतीकार्यक्रमाची जिल्हापातळीवर चोख अंमलबजावणी करणार
मुंबई, दि. १८ जुलै २०२२
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर प्रदेश काँग्रेसने शिर्डी येथे १ व २ जून रोजी घेतलेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील घोषणापत्राची अंमलबाजणी राज्यभर केली जाणार आहे. भाजपाच्या ‘भारत तोडो’ ला काँग्रेस ‘भारत जोडो’ अभियानाच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. शिर्डी घोषणापत्र व कृतीकार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
गांधी भवन येथे शिर्डी नवसंकल्प घोषणापत्र व कृतीकार्यक्रम जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, डॉ. विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे प्रवक्ते राकेश शेट्टी, आदी उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, शिर्डी कार्यशाळेसाठी उदयपूर शिबीराच्या धर्तीवर सहा विषयांसाठी सहा गट स्थापन करण्यात आले होते. या सहा गटांनी चर्चा करून त्यांचा अहवाल सादर केला. यातूनच शिर्डी घोषणापत्र व कृतीकार्यक्रम तयार करण्यात आला आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, अग्निपथ, जिवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आवाज उठवणार आहे. राज्यभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्या-जिल्ह्यात पदयात्रा काढून जनजागृती केली जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो’ अभिनयानही राबविले जाणार आहे. काँग्रेसचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवतानाच केंद्र सरकारच्या अपयशाची माहितीही जनतेला करून दिली जाणार आहे.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, शिर्डी कार्यशाळेत राज्यभरातून ३०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. दोन दिवसाच्या विचारमंथातून काँग्रेससाठी एक दिशादर्शक कार्यक्रम बनवण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आग्रही भूमिका मांडू व जनतेच्या हितासाठी या सर्व विषयांचा पाठपुरावा केला जाईल. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कृती कार्यक्रम राबविला जाणार आहे.
राजकीय गटाचे प्रमुख अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात समविचारी पक्षाबरोबर आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यासाठी एक जिल्हा स्तरावर समिक्षा समिती स्थापन केली जाईल व त्या समितीच्या निर्णयाचा विचार करून राज्य पातळीवर आघाडीचा बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीसह काँग्रेस विचाराची साहित्य निर्मिती व प्रचार करण्यासाठीही एक समिती बनवण्याचा विचार यात मांडण्यात आलेला आहे.
अर्थविषयक गटाचे प्रमुख पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशातील आर्थिक परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी झाले असून केंद्र सरकारचा अर्थव्यवस्थेवरचा ताबा सुटलेला आहे. कर्जाचे व्याज फेडणे, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडे पैसा नसल्याने पुन्हा कर्ज काढणे, कर वाढवणे अथवा सरकारी कंपन्या विकणे हाच सरकारचा कार्यक्रम आहे. शिर्डी घोषणापत्रात ‘मनरेगा’ सारखी योजना शहरी भागात राबवण्याची शिफारस केलेली आहे. काँग्रेस पक्षाने २०१९ च्या लोकसभा जाहिरनाम्यात दिलेल्या ‘न्याय’ योजनेची अंमलबजावणी काँग्रेस शासित राज्यात सुरु असून ही योजना महाराष्ट्रातही राबवली जावी. मराठवाडा, विदर्भ, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ पुन्हा सुरु करणे यासह विविध शिफारशी केल्या आहेत त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे.
युवा व महिला सक्षमीकरण गटाच्या प्रमुख प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, युवकांचा राजकारणात सक्रीय सहभाग वाढावा यासाठी महाविद्यालीन निवडणुका पुन्हा कराव्यात. युवकांना काँग्रेस पक्षाच्या मुख्य विचारधारेत सहभागी करून घेण्यासाठी राजीव गांधी युवा संवाद राबवणे, महिलांसाठी हेल्थ कार्ड, गावात इंदिरा गांधी महिला भवन बांधणे यासह विविध कार्यक्रमांच्या शिफारशी या घोषणापत्रात केलेल्या आहेत.
शिर्डी घोषणापत्राची अंमलबजावणी चोखपणे होते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना तातडीने मदत करा..
काँग्रेस शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी..
राज्यात मागील १५-२० दिवसांत अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत द्यावी व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती प्रती हेक्टरी 50 हजार रु, व बागायती शेतकऱ्यांना 1 लाख रु प्राथमिक मदत तत्काळ द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.
काँग्रेस नेत्यांकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पुढे अस म्हटले आहे की, राज्य सरकारने वाढीव वीजदराला स्थगिती द्यावी. विकास योजना आणि विकास कामांना दिलेली स्थगितीही तत्काळ उठवावी. आज इंदूर अंमळनेर बसला भीषण अपघात झाला असून यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनाह मदतीचा हात द्यावा. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत द्यावी अशा मागण्याही करण्यात आला.