माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा हस्तक्षेप
निलंबन आदेश मागे घेण्याचा मुख्याधिकारी संतोष माळी यांचा निर्णय
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे ):
उरण नगर परिषदेचे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आणि मधुकर भोईर यांनी त्यांच्या निलंबाना विरोधात २० जुलैपासून सनदशिर मार्गाने नगर पालिका प्रवेशद्वारा सामोरं बेमुदत उपोषण सुरू केले होते. सकाळ पासूनच त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा देण्यासाठी उरण तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यात ज्येष्ठ कामगार नेते ऍड सुरेश ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जेएनपीटी विश्वस्त आणि कामगार नेते कॉ भूषण पाटील, उरण सामजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील ( Ex IRS), शिवसेना उप जिल्हाध्यक्ष नरेश रहाळकर, शेकापचे ज्येष्ठ नेते काका पाटील, प्रकल्पग्रस्त शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश घरत, शिक्षक नेते नरसू पाटील, माजी नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर , ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सीमा घरत, माजी उप नगराध्यक्षा नाहिदा ठाकूर, श्रीमती आफशा मुकरी, सभापती शुभांगी पाटील, मा.जी.प. सदस्य जीवन गावंड, आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष संतोष भगत, नगरसेवक अतुल ठाकुर आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि निलंबनाची नोटीस मागे घेण्यासाठी आग्रही मागणी केली.
त्यानंतर ॲड सुरेश ठाकूर, प्रशांत पाटील, कॉम भूषण पाटील, सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या सर्व नागरिकांनी नगरपालिका कार्यालयात जावून उपोषण स्थळी मंडप घालण्यास परवानगी नाकारली म्हणून लेखी निवेदन देवून निषेध व्यक्त केला.
त्यानंतर शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी दुपारच्या वेळेस उपस्थित राहून उपोषणकर्ते आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. नंतर मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली, उपोषणकर्ते यांचे शिष्ठ मंडळाने मुख्याधिकारी यांच्या दालनात चर्चा केली. संतोष पवार यांच्या कार्यालयीन आणी सामाजिक कार्यातील कर्तव्यनिष्ठता अधोरेखित करून नगर पालिकेतील कामकाजात व्यत्यय निर्माण होवू नये व त्यामुळे पावसाळ्याच्या हंगामात नागरिकांना असुविधांना सामोरे जावे लागू नये यासाठी सदरहू दोन्ही कर्मचाऱ्यांची निलंबनाची कारवाई रद्द करावी अशी मागणी केली. मुख्याधिकारी यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मनोहर शेठ भोईर यांच्या सूचनेचा आदर राखत कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून निलंबन अधिकृत पणे मागे घेण्याचे मान्य केले. त्यानंतर उरण नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अनिल जगदानी यांनी मुख्याधिकारी यांच्या निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाची माहिती दिली.आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार संतोष पवार आणि मधुकर भोईर यांनी मनोहर शेठ भोईर, सुधाकर पाटील आणि अनिल जगदानी यांच्या हस्ते लिंबू पाण्याचे सेवन करून उपोषणाची यशस्वी सांगता केली.वरील पार्श्वभूमीवर दिनांक 22/07/2022 रोजी होणार निषेध मोर्चा रद्द करण्यात आला आहे.संतोष पवार व मधुकर भोईर यांनी सर्व राजकीय , सामाजिक, संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांचे उपोषणास पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.संतोष पवार व मधुकर भोईर यांच्यावरील निलंबनची कारवाई मागे घेतल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.