Ultimate magazine theme for WordPress.

संतोष पवार , मधुकर भोईर यांच्या नियमबाह्य निलंबनाच्या निषेधार्थ २२ जुलैला मोर्चा

0 34

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण नगर परिषदेत कार्यरत असलेले आणि सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आणि कार्यतत्पर कर्मचारी मधुकर भोईर यांनी कार्यालयीन कामकाजात कुठलीही कसूर केलेली नसताना, केवळ काही सामाजिक आंदोलनात सहभागी होत असल्याच्या कारणावरून नगर परिषदेचे कर्मचारी संतोष पवार व मधुकर भोईर यांना उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी अनुक्रमे दि. १३/०७/२०२२ आणि दि. ०७/०७/२०२२ च्या आदेशान्वये नियमबाह्य पद्धतीने आणि वैयक्तिक आकसापोटी निलंबीत केलेले आहे.त्यामुळे २२ जुलै २०२२ उरण नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

संतोष पवार हे उरण तालुक्यातील एक सेवाभावी कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून त्यांनी पालिकेच्या प्रत्येक विभागात उत्कृष्ट सेवा दिलेली आहे. आपल्या नियत कर्तव्याच्या पलिकडे जाऊनही प्रसंग पडेल तेव्हा पालिकेच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. उरण शहरातील जनता मागील ३० वर्षापासून त्यांच्या सेवेची साक्षीदार आहे. तालुक्यातील कुणावरही वैयक्तिक संकट आले किंवा नैसर्गिक आपत्ती ओढवली तर संतोष पवारांचा अशा प्रसंगी स्वयंस्फूर्त पुढाकार असतो. तालुक्यातील इतर शासकिय यंत्रणा आणि कर्मचारी यांनाही त्यांच्या या कार्याची ओळख आहे. मार्च २०२० मध्ये उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या साथीत सापडलेल्या कोरोना रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी जे सहकार्य केले  ते उरणची जनता कधीच विसरणार नाही. उरण तालुक्याचे कोरोना नोडल ऑफर म्हणून त्यांनी आपला मुक्काम बोकडविरा येथील कोरोना सेंटरमध्ये ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत राहून ते प्रत्येक कोरोना रुग्णांची व्यक्तिशः काळजी घेत होते . ही सेवा त्यांनी जवळपास दोन वर्षे दिली. अशा या निरलस सेवाभावी कर्मचाऱ्याला केवळ हॉस्पिटलच्या मागणीसाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी, शैक्षणिक कार्यासाठी आणि शेतकरी-कामगार यांच्या अन्यायाविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झाले म्हणून निलंबीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कार्यालयीन कामकाजात कसूर केली म्हणून सदरहू मुख्याधिकारी यांनी त्यांना सबळ कारण देऊन एकही नोटीस बजावलेली नाही. संतोष पवार हे उरण नगरपालिकेतील कर्मचारी आणि सफाई कामगारांचे नेतृत्व करतात.म्हणून कुणाच्या तरी दबावाखाली येऊन त्यांच्यावर ही अन्यायकारक कारवाई झालेली आहे. 

 मुख्याधिकारी यांनी दूसरे निलंबित केलेले कर्मचारी मधुकर भोईर हे सुद्धा नगरपालिकेचे कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी आहेत. गोर-गरीबांना ते आपल्या तुटपुंज्या पगारातून मदत करत असतात. त्यांच्या एखादे अनाथ निदर्शनास आल्यास त्याचे पालकत्व स्वीकारून सक्षम होईपर्यंत त्या अनाथ मुलांचे पालन पोषण मधुकर भोईर करतात. त्यांनी १०-१२ अनाथ मुलांना अशाप्रकारे आश्रय दिलेला आहे. मधुकर भोईर आणि इतर तीन कर्मचारी यांनी त्यांच्या ड्युटीच्या वेळेत रात्री १.३० ते २.०० च्या अर्ध्या तासाच्या वेळेत फोन उचलला नाही या केवळ एका कथित कारणासाठी केवळ एकटे मधुकर भोईर यांनाच निलंबीत केले आहे. यावरून त्यांचा दुजाभाव दिसून येतो. त्याआधी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मधुकर भोईर यांना एकदाही नोटीस दिलेली नाही. मधुकर भोईर हे सफाई कामगारांचे नेतृत्व करतात म्हणून केवळ त्या आकसापोटी निलंबित केलेले आहे.

 जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असलेल्या कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांविरोधात वरीलप्रमाणे आकसाने,सुडबुद्धीने आणि हुकुमशाही पद्धतीने कारवाई होत असेल तर त्याचा विपरित परिणाम इतर नगरपालिका कर्मचारी वर्गावर होऊन शहरातील विविध सेवांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल आणि उरणवासीयांचे दैनंदीन जीवन प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील सजग नागरिक म्हणून सदर मुख्याधिकारी यांचा निषेध करण्यासाठी विविध सामाजिक संस्था संघटनांनी मुख्याधिकारी संतोष माळी यांचा निषेध करण्यासाठी शुक्रवार दि. २२ जुलै २०२२ रोजी उरण नगरपालिकेवर मोर्चाचे आयोजन केले आहे. सदर मोर्चा आनंदनगर येथून १०.३० वाजता निघेल आणि राजपाल नाका, गणपती चौक, महात्मा गांधी चौक, नगराज नाका मार्गे नगरपालिका कार्यालयाकडे प्रस्थान करेल. सदरहू मोर्चाप्रसंगी राज्यस्तरावरील विविध कामगार आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. 
कोट (चौकट ):-
उरण नगर परिषदेचे कर्मचारी संतोष पवार व मधुकर भोईर यांच्यावर कोणत्याही सूड बुद्धिने किंवा आकसापोटी कारवाई केलेली नाही. संतोष पवार किंवा मधुकर भोईर यांच्याविषयीं माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा राग नाही. शासकीय नियमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी तसेच प्रशासनाचे नियम पाळत नसल्याने त्यांच्यावर निलंबणाची कारवाई केलेली आहे. या अगोदर त्यांना नोटीसा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तसेच तोंडी सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. वारंवार सांगून सुद्धा सदर कर्मचारी शासकीय नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आलेली आहे.शासकीय कर्मचाऱ्यांना विविध सामाजिक संस्थेच्या आंदोलनात, उपोषणात सहभागी होऊन शासनाच्या विरोधात आंदोलन, उपोषण करता येत नाहीत.घोषणाबाजी करता येत नाही.सदर कर्मचाऱ्यांवर शासकीय नियमानुसार योग्य ती कारवाई केलेली आहे.त्यांच्यावर अन्याय झाला आहे असे वाटल्यास सदर कर्मचारी योग्य प्राधिकरणाकडे किंवा न्यायायलयात आपली बाजू लोकशाही पद्धतीने व कायदेशीरपणे बाजू मांडू शकतात.- संतोष माळीमुख्याधिकारी, उरण नगर परिषद.

Leave A Reply

Your email address will not be published.