सरंद -आंबव गावांना जोडणारा साकव मोडला
दुरुस्तीसाठी आ. शेखर निकम यांना साकडे
माखजन : सरंद आणि आंबव या गावाला जोडणारा साकव अखेरची घटका मोजत आहे. या साकवाची अवस्था दयनीय झाली असताना सकवाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता या साकवाच्या दुरुस्तीसाठी आमदार शेखर निकम यांना साकडे घालण्यात आले आहे.
तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीधर फणसे यांच्या प्रयत्नाने 30 वर्षेपूर्वी तत्कालीन आमदार डॉ. विनय नातू यांच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील सरंद आणि आंबव या गावांना जोडणारा साकव जाधववाडी येथे बांधण्यात आला होता. या गेल्या 30 वर्षात बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी या साकवाच्या दुरुस्तीकडे ढुंकूनही बघितले नाही.
आता हा साकव पूर्णपणे मोडकळीस आला असून गंजल्याने अखेरची घटका मोजत आहे. पाच वर्षांपूर्वी या सकवाच्या दुरुस्तीसाठी पाच लाख रुपये मंजूर होऊन साकवाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढून ठेकेदारही नेमण्यात आला. मात्र या साकवाची दुरुस्ती होऊ शकली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी साकवाची दुरुस्ती का झाली नाही तसेच मंजूर निधीचे काय झाले याचा खुलासा करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
सरंद जाधववाडी येथे असणारा हा साकव आंबव गावातील कोष्टेवाडी, बौद्धवाडी आदी वाड्यांना जोडणारा असून शालेय विद्यार्थीही याच साकवावरून शाळेत येजा करतात. आता या साकवाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी केली आहे.
.