सरंद येथे उद्या सामूहिक नांगरणी व अत्याधुनिक लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन नजीक सरंद येथे ७ जुलै रोजी सामूहिक नांगरणी व अत्याधुनिक लावणीच्या यंत्राचे प्रात्यक्षिक अशा दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सरंद येथील बळीराजा शेतकरी मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ रोजी सकाळी १० वाजता या कार्यक्रमांना सुरवात होणार आहे.
हा कार्यक्रम सरंद येथील भागवत दुकानाच्या शेजारी होणार आहे. सामूहिक भातलावणी व चिखलणी ला कोकणात २०११ साली प्रथम सरंद येथे सुरवात झाली.बळीराजा शेतकरी मंडळ सरंद व प्रगती ग्रामविकास संस्था माखजन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना एकत्र आणून जुलै २०११ मध्ये सामूहिक भात लावणी व चिखलणी ची बीजं रोवली गेली.पुढे सर्वत्र याचा स्वीकार केला गेला.परिणामी अनेक जणं पुन्हा सामूहिक भातशेतीकडे वळले. दरम्यान, ७ रोजी सामूहिक चिखलणी सोबतच शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्राद्वारे भातलावणी कशी केली जाते? याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.यासाठी विशेषतः कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने,माजी जि.प.उपाध्यक्ष संतोष थेराडे, जि.प सदस्य शंकर भुवड,पं.स सदस्य,सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी सरपंच,कृषी खात्याचे अधिकारी व शेतकरी वर्ग उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन बळीराजा शेतकरी मंडळ व ग्रामस्थ मंडळ सरंद यांनी केले आहे