Ultimate magazine theme for WordPress.

सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील

0 44

मुंबई उच्च न्यायालयातर्फे आयोजित समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या जागेबाबत लवकरच निर्णय घेणार

मुंबई दि. 10 : महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा आज सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्याच्या अर्थसंकल्पात सध्या एक टक्केपेक्षा थोडी कमी तरतूद विधि व न्यायसाठी असून ती वाढवून एक टक्क्यांपर्यंत आणण्याचा देखील मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे व लवकरच त्याबाबतीत निर्णय घेतला जाईल हे सांगितले.

हॉटेल ताज पॅलेसच्या क्रिस्टल हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय विधि व न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, अमिता उदय लळीत, झुमा दत्ता,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांची उपस्थिती होती. मुंबई उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती उपस्थित होते.

यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळीत यांचा हृद्य सत्कार करण्यात आला तसेच संस्कृतमधील गौरव पत्र देण्यात आले. तर झुमा दत्ता यांच्या हस्ते अमिता उदय लळीत यांना मानचिन्ह देण्यात आले.

सतत स्वतःला विकसित करा – सरन्यायाधीश उदय लळीत

आपल्या सत्काराला उत्तर देताना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्यांच्या कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईपासून करिअरची सुरुवात करून आज सरन्यायाधीश म्हणून मुंबईत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारताना मला कृतज्ञ वाटते आहे असे सांगून उदय लळीत म्हणाले की, वकील व्यवसायात सतत स्वतःला विकसित करणे व सुधारणा करीत राहणे हीच या व्यवसायाची खासियत आहे. सर्वोच्च न्यायालय ही माझी मातृसंस्था आणि कर्मभूमी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी सर्वोच्च न्यायालयात काम केले.

Leave A Reply

Your email address will not be published.