सहकार विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न
मुंबई : राज्यात सहकाराची चळवळ काँग्रेसच्या माध्यमातून रुजली व सर्वदूर वाढली. सहकारातून समृद्धीकडे या ब्रिदवाक्यानुसार राज्यातील सर्वसामान्य लोकांना समृद्ध करण्यासाठी या चळवळीची मोलाची मदत झाली आहे. यापुढेही शहरी व ग्रामीण भागात सहकाराचा विस्तार करा व सहकाराच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसच्या सहकार विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सहकार विभागाच्या प्रदेशाध्यक्ष ऍड शुभांगी शेरेकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, उपाध्यक्ष व माजी आमदार हुस्नबानो खलिफे, व्हिजेएनटी विभागाचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, किसान सेलचे पराग पाष्टे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस जो. जो. थॉमस, यशवंत हाप्पे आदी उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, सहकारामुळे राज्याच्या प्रगतीला चालना मिळाली व महाराष्ट्र देशातील एक अग्रेसर राज्य ठरले परंतु केंद्रातील भाजपा सरकारची सहकारावरही वक्रदृष्टी पडली व ही चळवळच मोडीत काढायचा चंग बांधून केंद्रात सरकार खाते निर्माण केले आहे. देशातील सर्व व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सुरु असून आता सहकारही संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. परंतु दिल्लीची महाराष्ट्रावर वक्रदृष्टी पडली तरी महाराष्ट्रावर मात करणे दिल्लीला शक्य नाही हा आतापर्यंतचा इतिहास सांगतो. देशात व राज्यात सध्या असलेले राजकीय चित्र बदलायचे आहे त्यासाठी हिमतीने काम करा व पुन्हा एकदा महाराष्ट्रात व देशात काँग्रेसचे सरकार आणूया.
यावेळी सहकार विभागाच्या प्रदेशाध्यक्ष शुभांगी शेरेकर, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व इतर नेत्यांचीही भाषणे झाली.
प्रदेश काँग्रेसच्या परिवहन विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळाही यावेळी पार पडला.
ठाणे, भिवंडी व कल्याणमधील शेकडो महिलांचा काँग्रेसपक्षात प्रवेश
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या व्हिजेएनटी विभागाचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात ठाणे, भिवंडी, कल्याण, मुंबईतील बांद्रा व चेंबूर येथील शेकडो महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.