सायले गावची कन्या बनली प्रचारिका
पल्लवी शिंदे या तरुणीच्या निर्णयाचे होतेय स्वागत
संगमेश्वर : उच्च शिक्षण घ्यायचे, नोकरी करायची, संसार थाटायचा असे प्रत्येक मुला मुलीचे स्वप्न असते. आई वडीलांची देखील तशी अपेक्षा असते. मात्र याला संगमेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागातील युवतीने छेद दिला आहे. राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून ही युवती एक वर्षासाठी घरातील मंडळी, मैत्रिणी यांना गुडबाय करत रायगड जिल्ह्यात प्रचारिका म्हणून घराबाहेर पडली आहे. पल्लवी प्रकाश शिंदे असे या तरुणीचे नाव आहे.
देशसेवा करण्याच्या उद्देशाने पल्लवी हिने पाऊल टाकले आहे. पल्लवीचा हा निर्णय आजच्या तरुणपिढीसाठी आदर्शवत व प्रेरणादायी आहे.
देवरुख पासून ६ कि.मी. अंतरावर सायले गाव वसलेला आहे. याच ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात पल्लविचा जन्म झाला. पहिली ते सातवी शिक्षण सायले प्राथमिक शाळा, आठवी ते दहावी शिक्षण सोनवडे हायस्कूल, अकरावी ते एमए पर्यंत शिक्षण देवरुख आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयातून झाले. समाजशास्त्र विषयात तिने पदवी घेतली आहे.
महाविद्यालयीन जीवनात पल्लविचा संपर्क सामाजिक कार्यकर्त्या, राष्ट्र सेविका समितीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या नेहाताई जोशी यांच्याशी आला. जोशी यांच्या कामाने पल्लवी प्रभावित झाली. अन तेव्हा पासून पल्लवी राष्ट्र सेविका समितीशी जोडली गेली. समितीच्या वतीने आयोजित प्रत्येक कार्यक्रमात ती हिरहिरीने सहभागी होते. नेहाताई जोशी यांच्या प्रेरनेने सामाजिक कार्याची ओढ लागल्याचे पल्लवी सांगते. हे कार्य करताना आई वडील, भाऊ बहीण यांची खंबीर साथ लाभत असल्याचे पल्लवी आवर्जून सांगते.
पल्लवी गेली सात वर्षे राष्ट्र सेविका समितीचे काम करत आहे.या माध्यमातून तिला देशसेवेची प्रेरणा मिळाली आहे. पल्लवीचा भाऊ प्रसाद शिंदे व विशाल शिंदे हे देखील अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रामाणिक काम करत आहेत.
पल्लवी हिने राष्ट्र सेविका समितिची पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून रायगड जिल्ह्यात एक वर्ष प्रचारिका म्हणून जाण्याचा निर्णय घेत प्रत्यक्षात शुक्रवारी ती रायगडाकडे रवाना झाली आहे. त्यानिमित्त संघ परिवारातील संघटनांच्यावतीने तिला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सौ. कशेलकर, कुमारजी जोगळेकर , तसेच तालुका संघ चालक चंद्रकांत जोशी , समितिच्या तालुका कार्यवाहिका सरिता सोलकर , प्रसाद शिंदे, शृंगारे सर, भाजप तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव , शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये , अभाविप चे शिवराज कांबळे उपस्थित होते.
आजची तरुण पिढी मोबाईलच्या जाळ्यात गुरफटली असल्याचे चित्र आहे. जवळ असून देखील एकमेकांशी संवाद होत नाही. पल्लवीचे वय देखील मौजमजा करण्याचे आहे. मात्र तिने याला बगल देत पचारिका म्हणून बाहेर पडली आहे. प्रचारिका म्हणून बाहेर पडल्यानंतर समिती जे काम सांगेल ते स्व खुशीने करणे, ज्या घरात जे अन्न मिळेल खावे लागते.
आई वडिलांना शाळा, महाविद्यालयात गेलेली आपली मुलगी घरी केव्हा येईल याची चिंता लागलेली असते. मात्र पल्लवीच्या आई वडिलांनी तिला बिंनधास्तपणे एक वर्ष प्रचारिका जाण्यास तयारी दर्शवली आहे. समितीचे काम, कार्यकर्त्यांची कामावरील निष्ठा यामुळेच हे शक्य होत आहे.