सार्वजनिक, खासगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २१ : मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील सर्व संस्था व कंपन्यांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती (ER-I) राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या http://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रविंद्र प्र. सुरवसे यांनी दिली. ही माहिती मुदतीत भरण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सेवायोजन कार्यालये कायदा १९५९ अन्वये रिक्त सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्याअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री अशी एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस सादर करणे बंधनकारक आहे. सर्व आस्थापनांकडून १०० टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांना यापूर्वीच यूजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या http://mahaswayam.gov.in संकेतस्थळावर लॉगिन करावे व कायद्याचे अनुपालन करावे, असे आवाहन केले आहे.
यासंदर्भात माहितीसाठी mumbaicity.employment@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालय, श्रेयस चेंबर्स, १ ला माळा १७५, डि.एन. रोड, फोर्ट मुंबई – ४००००१ या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.