रत्नागिरी : सिंधुदुर्गात टोल वसुलीविरोधात भाजपाच्य दणक्यानंतर प्रशासनाने टोलवसुलीचा निर्णय मागे घेतला असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात राजापुरातील हातिवले येथील टोल वसुलीविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेत टोल वसुली बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे सिंधुदुर्ग प्रमाणेच राजापूरातील हातिवले येथील टोल नाक्यावरिल टोलवसुलीलाही स्थगिती देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापुरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या टोलवसुली विरोधात आक्रमक पवित्रा घेत थेट खारेपाटण गाठत याबाबचे निवेदनच महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना दिले.
रत्नागिरी जिल्हयात मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. राजापूर तालुक्यात राजापूर तळगाव पन्हळे टाकेवाडी ते वाकेड पर्यंतच महामार्गाचे काम झाले आहे. पुढे लांजापासून अगदी पाली, हातखंबा, संमेश्वर, चिपळूण, खेड भागात काम अपुर्ण असून काही भागात कामच सुरू झालेले नाही. मात्र, असे असतानाही व रस्ता पुर्ण झालेला नसतानाही महामार्ग प्रशासनाच्या वतीने बुधवार दि. 1 जूनपासून सिंधुदुर्ग जिल्हयात ओसरगाव व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील हातिवले या दोन टोल नाक्यावरून टोल वसुली सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या बातचे दरपत्रकही जाहीर करण्यात आले होते.
सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावरून टोलवसुली करण्यास भाजपाने कडाडून विरोध केला. त्यामुळे तेथील टोल वसुली स्थगित करण्यात आली. मात्र हातिवलेच काय होणार, असा प्रश्न अनेकांना होता. मात्र याबाबत भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांना स्थानिकांनी माहिती देताच त्यांनी याची तत्काळ दखल घेत संबधीत अधिकार्यांशी संपर्क साधून हातिवले येथील टोल वसुली थांबवावी अशी मागणी केली. तर स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही टोलवसुली विरोधात टोल नाक्यावर धडक दिली व तेथून पुढे महामार्ग विभागाच्या खारेपाटण कार्यालयात जाऊन लेखी निवेदन देत 1 जून 2022 पासून सुरु होणारा टोल सुरु करू नये, अशी मागणी केली.
भाजपाचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम उपविभाग महामार्ग खारेपाटणचे उपअभियंता यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. प्रसंगी भााजपाचे जिल्हा सहकार सेलचे प्रमुख अनिलकुमार करंगुटकर, तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, राजा काजवे, फारूख साखरकर, निलेश वाईम, अशोक पेडणेकर, आशिष मालवणकर, विजय कुबडे, अरविंद लांजेकर, राजाराम गुरव, सोहम खडपे, सचिन मांजरेकर, रुपेश गुरव, अमित गुरव, संतोष धुरत, निखिल बेंद्रे, सिध्देश कदम, महिला आघाडीच्या सोनल केळकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |
Prev Post